भूमिगत गटार दुर्घटनेत मयत झालेला रियाज जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांना भरीव स्वरूपाची आर्थिक मदत शासनाकडून मिळवून दिली जाईल असे आमदार अमोल खताळ यांनी सांत्वनपर भेटीत सांगितले होते. आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी पिंजारी यांच्या घरी जाऊन माणुसकीच्या भावनेतून कुटुंबीयांचे सांत्वन करत भरीव स्वरूपाची आर्थिक मदत कुटुंबियांकडे सुपूर्द केली असल्याचे माजी भाजप नेते व माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी सांगितले.

संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटारीच्या चेंबरमधील मैला काढत असताना अतुल रतन पवार या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याचा चेंबरमध्येच गुदमरून मृत्यू झाला होता, तर त्याला वाचविण्यास गेलेल्या रियाज जावेद पिंजारी याचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेतील अतुल पवार यास नगरपरिषदेच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली.
परंतु रियाज पिंजारी हा सुद्धा मित्राला वाचविण्यास गेला होता म्हणून त्यालाही आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आमदार अमोल खताळ यांच्याकडे पिंजारी यांच्या नातेवाईकांनी केली होती, त्यानुसार माणुसकीच्या भावनेतुन पिंजारी कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी चर्चा आ.अमोल खताळ आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यात झाली. त्यानुसार मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी पिंजारी कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेतली त्यावेळी माणुसकीच्या भावनेतून पिंजारी कुटुंबीयांना भरीव स्वरूपातील आर्थिक मदत दिल्याबद्दल आ. अमोल खताळ यांनी मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
संगमनेर येथील रियाज जावेद पिंजारी हा तरुण माणुसकीच्या भावनेतून अतुल पवार यास वाचविण्यात गेला होता त्यामुळे पिंजारी यांच्या कुटुंबियांना सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळाच्या सभागृहात केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर विशेष बाब म्हणून पिंजारी कुटुंबीयांना आमदार अमोल खताळ हे आर्थिक मदत मिळून देतील असेही माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी सांगितले.