घरकुलासाठी भूमिहीनांना हक्काची जमीन देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय – आ.अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला आले यश

जिल्ह्यातील भूमिहीनांना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी हक्काची जमीन मिळावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे केली होती या मागणीची त्यांनी दखल घेतली आणि त्यांच्या सूचनेनंतर संपूर्ण जिल्ह्यातील घरकुलांसाठी भूमिहीनांना हक्काची जमीन देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे त्यामुळे भूमीहीनांना दिलासा मिळाला आहे.

भूमिहीन लाभार्थ्यांसाठी शासकीय, गायरान आणि गावठाण विस्तार योजनेंतर्गत शिल्लक भूखंड तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार असून हजारो गरजू कुटुंबांना स्वतःचे घरकुल उभारण्यासाठी जमीन उपलब्ध होणार असल्याबाबतचे परिपत्रक जिल्हा अधिकारी कार्यालयाने जारी केले आहे. त्यामुळे भूमिहीनांना आता घरे बांधण्यास कुठलीही अडचण येणार नाही. आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर या निर्णयामुळे यश आले आहे.

प्रत्येक तहसीलदार यांनी गायरान व शासकीय जमिनींची नोंद घेऊन त्यानुसार लँड बँक तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गावनिहाय लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्या घरकुलासाठी आवश्यक जमिनीचा आराखडा तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.ग्रामपंचायतींपासून उपविभागीय कार्या लयांपर्यंत संपूर्ण साखळीबद्ध व वेळेत पूर्ण होणारी प्रक्रिया निश्‍चित करण्यात आली आहे. ना हरकत दाखले, अभिप्राय, स्थळ निरीक्षण, ताबा प्रक्रिया इत्यादींसाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

मी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रश्नावर आवाज उठवला होता. अनेक भूमिहीन लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नव्हता. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकामुळे ही मागणी मान्य झाली आहे. ही योजना पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होणार आहे, यासाठी मी स्वतः लक्ष ठेवणार आहे. ग्रामविकासासाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *