संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वीजेच्या प्रश्नांसाठी आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. तसेच शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने वीज पुरवठा मिळण्यासाठी आ. खताळ यांच्या माध्यमातून साकूर विज उपकेंद्रामध्ये १० एम.व्ही.ए. चे दोन ट्रान्स फॉर्मर बसविण्यात आल्याने पठार भागातील विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच पठारभागातील प्रत्येक गाव, वाडीवस्तीवरील विजपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले यांनी दिली.


संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सबस्टेशनमध्ये ५ एम.व्ही.ए. चे चार ट्रान्स फॉर्मर असल्याने विद्युत पुरवठा कमी पडत होता. मात्र विद्युत पुरवठा कमी पडत असल्याने शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतीपिकांचे नुकसान होत होते. परंतु ही परिस्थिती आ. अमोल खताळ यांच्याकडे भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले आणि भाजप राज्य कार्यकारणी सदस्य रऊफ शेख यांनी मांडली होती.
त्यानंतर तातडीने आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली साकूर महावितरण कार्यालयासमोरच आढावा बैठक घेण्यात आली होती. त्या वेळी विद्युत पुरवठा कमी पडत असल्याचे आमदार अमोल खताळ यांच्या त्याच वेळी निदर्शनास आल्याने सदर ५ एम. व्ही.ए. चे चार ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या पुराव्याला यश येऊन आणखीन नवीन १० एम. व्ही. ए. चे दोन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे विजपुरवठा आता पुर्ण दाबाने शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना शेती पिकांना विज पुरवठा कमी दाबाने मिळत असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात होता. मात्र आ. अमोल खताळ यांनी अथक परिश्रम घेऊन पाठपुरावा करत साकूर पठार भागाचा वीजेचा प्रश्न कायमचा सोडविला आहे. त्यामुळे आ. अमोल खताळ यांचे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर जवळील जांबुत आणि कौठे मलकापूर फिडरच्या बाय फर्गेशन लाईनला मंजुरी आ. अमोल खताळ यांनी आणली आहे. त्यामुळे दोन्ही फिडरवर असलेल्या गावांना यांचा मोठा फायदा होऊन विजेचा कायमचा प्रश्न सुटणार आहे. त्याचबरोबर नांदूर खदरमाळ सब स्टेशनचे काम लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.