हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. या साखर कारखान्याच्या संचालिका रेखा बाबुराव बोत्रे-पाटील यांना “महिला आयकॉन” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय साखर उद्योगात महिलांचे सशक्त नेतृत्व अधोरेखित करणारा हा पुरस्कार त्यांना कारखान्याच्या उत्कृष्ट व्यवस्थापन, गाळप क्षमता वृद्धी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय याबद्दल प्रदान करण्यात आला.

हा मानाचा पुरस्कार कोल्हापूर येथे पार पडलेल्या एका भव्य समारंभात नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर मिल्सचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, सचिव संग्रामसिंह शिंदे, उपाध्यक्ष डी. एम. रासकर व सदस्य रणवीरसिंह शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
- उद्योगाच्या संकटातून भरारीकडे वाटचाल
ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, रेखा बोत्रे यांनी गौरी शुगरच्या व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेतला. अडचणींच्या काळात देखील त्यांनी कारखान्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. गाळप हंगाम 2023-24 आणि 2024-25 मध्ये कारखान्याने उच्चांकी उसाचे गाळप साध्य केले, शेतकऱ्यांना उच्च बाजारभाव मिळवून दिला, तसेच उस तोडणी, वाहतूकदार व कामगार वर्गासाठी न्यायकारक अंमलबजावणी केली.
- संस्थात्मक यशामागे मजबूत टीम
या यशामध्ये कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहीदास यादव, खातेप्रमुख भास्कर काकडे, तसेच योगेश राऊत, प्रल्हाद मोढवे, संदीप जाधव, नवनाथ देवकर, विकास क्षीरसागर, समीर जकाते, शशिकांत चकोर दौडकर, ज्योतीराम रोडे, प्रमोद ननवरे, अजित शेळके, रामलिंग खांडेकर, राजेंद्र वाळके, सुनील खेडकर, नितीन दरेकर, संभाजी चव्हाण आणि सचिन गावडे यांचेही मोलाचे योगदान आहे.
- स्त्री नेतृत्वाचा आदर्श
रेखा बोत्रे यांचा हा सन्मान ग्रामीण भागातील महिलांसाठी नेतृत्वाची नवी दिशा आणि प्रेरणा ठरतो आहे. औद्योगिक व्यवस्थापनात महिलांचं योगदान निर्णायक ठरू शकतं, याचा हा पुरस्कार एक जिवंत पुरावा आहे.
(प्रतिनिधी – गणेश कविटकर)