सोलापूर – राजुरी येथील गोविंद पर्व कारखाना अखेर राणा शिपिंग कंपनीकडे अधिकृतरीत्या सुपूर्त करण्यात आला आहे. हा कारखाना सेवानिवृत्त शिक्षक, आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब जगताप यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन सुरू केला होता. मात्र तांत्रिक अडचणींबरोबरच चुकीच्या व्यवस्थापनामुळे हा कारखाना बंद पडला आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कोट्यवधी रुपये थकीत राहिले होते.

कर्जवसुलीसाठी जिल्हा बँकेने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (NCLT) मुंबई खंडपीठात याचिका दाखल केली होती. निकाल बँकेच्या बाजूने लागल्यावर रिझोल्यूशन प्रोफेशनलची नियुक्ती करण्यात आली. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर राणा शिपिंग कंपनीने निविदा रक्कम भरून कारखाना विकत घेतला. सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर केल्यानंतर सर्व कागदपत्रांसह कारखान्याचा ताबा १७ जुलै २०२५ रोजी राणा शिपिंगकडे हस्तांतरित करण्यात आला.
या विक्रीतून जिल्हा बँकेचे सुमारे पावणे पाच कोटी रुपये वसूल झाले असून उर्वरित कोट्यवधी रुपयांची वसुली संचालक मंडळाच्या वैयक्तिक मालमत्तेतून करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. राणा सूर्यवंशी हे पूर्वी कंपनीशी संबंधित होते. पण त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु सातत्याने प्रयत्न करून त्यांनी हा कारखाना योग्य वेळी जिद्दीने ताब्यात घेतल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. यापुढे तेच ह्या कारखान्याचे संचालन करणार आहेत.
या सर्व प्रक्रिये दरम्यान बराच राजकीय तसेच तांत्रिक हस्तक्षेप असूनही राणा शिपिंग कंपनीने अनेक अडथळ्यांवर मात करत गोविंद पर्व कारखाना यशस्वीरित्या खरेदी केली, हे स्थानिक उद्योग पुनरुज्जीवनाचे महत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे.
- स्थानिक रोजगार व औद्योगिक मूल्यवर्धनाला बळकटी
- राणा शिपिंग कंपनीने सदर कारखान्यावर ताबा मिळवून पुन्हा सुचारू पद्धतीने सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथील स्थानिक लोकांकडून खूप सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत आणि लोकांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कारण कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ४००–५०० स्थानिक रोजगार निर्माण होणार आहे. तसेच उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या कच्च्या अवशिष्टाचा/कचऱ्याचा कार्यक्षम उपयोग करून ‘प्लाय लाकूड विभाग’ उभारला जाणार असून त्यामुळे अनेक अतिरिक्त मूल्यवर्धन व पूरक रोजगार संधी उपलब्ध होतील. नवीन गुंतवणूक, अपेक्षित रोजगारनिर्मिती आणि साखर/ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये वाढलेला उत्साह यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सकारात्मक चर्चेला सुरुवात झाली आहे. स्थानिक अर्थचक्राला चालना देत ग्रामीण भागात औद्योगिक क्रियाशीलता पुनरुज्जीवित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.