आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. संगमनेर तालुक्यात विकासाचा नवा मापदंड त्यांनी निर्माण केला आहे. संगमनेर आणि राहत्याची तुलना कधीच होऊ शकत नाही तिकडे संस्कृती आहे, तर इकडे दडपशाही आहे. या दडपशाहीतून मुक्तीसाठी नागरिकांना मोठी संधी असून सौ.प्रभावती घोगरे या विक्रमी मताधिक्याने विजयी होऊन शिर्डी मतदार संघातून विधानसभेत जायंट किलर ठरतील असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला असून राहता तालुक्यातील नागरिकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ही लढाई असल्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
शिर्डी येथील नगर परिषदेच्या प्रांगणात सौ.प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सौ.प्रभावती घोगरे, रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड, शिवसेनेचे सचिन कोते, सुहास वाहढणे, नानाभाऊ बावके, राष्ट्रवादीचे शशिकांत लोळगे, सखाराम चौधरी,काँग्रेसचे प्रवक्ते सुदर्शन कुमार रॉय, घनश्याम शेलार, नारायणराव कारले,सचिन चौगुले,सुरेश थोरात,लताताई डांगे, श्रीकांत मापारी, मिलिंद कानवडे,नवनाथ आंधळे,अविनाश दंडवते, पंकज लोंढे,शितल लहारे,संजय शिंदे, सुधाकर शिंदे आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना खासदार लंके म्हणाले की, विखे यांच्या पराजयाची सुरुवात गणेश कारखान्यापासून झाली. दक्षिणेत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांचा पराभव केला. मोठी शक्ती वगैरे काहीच नाही. त्यांची फक्त दडपशाही चालते. पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. विकास कामे काय असतात आणि तालुका पुढे कसा न्यायचा असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगमनेर तालुका.
आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व आहे खरी संस्कृती संगमनेर मध्ये आहे. या उलट राहत्या मध्ये फक्त दडपशाही आहे. अभी नही तो कभी नही ही संधी चालून आली आहे. सर्वांनी सौ. घोगरे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन करताना सौ.घोगरे या महाराष्ट्रातील जॉईंट कलर ठरतील असा विश्वास व्यक्त केला.
तर आमदार थोरात म्हणाले की, राहता तालुक्याला गुलामगिरीतून बाहेर पडण्याची ही मोठी संधी आहे. यावेळेस त्यांचा कार्यक्रम झालाच पाहिजे. मी या मतदारसंघाचा मतदार आहे. संगमनेर प्रमाणे शांतता सुव्यवस्था आणि वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण काम करत आहोत.बारा दिवस तुम्ही महाविकास आघाडीसाठी द्या. पुढील पाच वर्षे तुमची जबाबदारी आम्ही घेतो. साठ वर्षात ज्यांना एमआयडीसी करता आली नाही. त्यांनी फक्त एमआयडीसीचे गाजर दाखवले आहे. आणि प्लॉट कोणाला दिले आहे याची चौकशी झाली पाहिजे. नगर मनमाड रस्त्याने अनेकांचे जीव घेतले. हे ज्यांना करता आले नाही ते काय विकास करणार असे सांगताना सरकार आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी विनाकारण त्रास दिला त्या सगळ्याची दुरुस्ती करू असा इशाराही त्यांनी दिला.

तर खासदार वाकचौरे म्हणाले की, ही परिवर्तनाची लढाई आहे, राहता तालुक्यातील दडपशाही आणि हुकूमशाही रोखण्यासाठी प्रभावती ताई घोगरे ही साधी गृहिणी सर्वांच्या सोबतीला आहे सर्वांनी आपल्या बहिणीच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन केले.
तर सौ.घोगरे म्हणाल्या की, शिर्डी येथील सभेतील उपस्थितीने समोरच्यांना धडकी भरली आहे. एकेकाळी समृद्ध असलेला राहता तालुका यांनी उध्वस्त केला असून सत्ताधारी इतके घाबरले आहेत. की साधा अनुक्रमांक एक मिळवण्यासाठी भ्रष्ट सरकारचा आसरा घ्यावा लागला. यावेळी घनश्याम शेलार व बाळासाहेब गायकवाड यांनीही विखे यांच्यावर जोरदार टीका केली.
याप्रसंगी सुहास वाहढणे, नानाभाऊ बावके, शशिकांत लोळगे, भाऊसाहेब कातोरे, नारायणराव कारले आदींसह विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली.यावेळी शिर्डीसह परिसरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.