शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या वतीने किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड पालखी सोहळा उत्साहात मार्गस्थ झाला असून हे दुसरे वर्षे आहे. यावेळी तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी पालखी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.पालखी सोहळा मार्गस्थ होताना अनेक मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब नाहटा, एम डी शिंदे, अरविंद कापसे, रमेश शिंदे, राजुदादा गोरे, सुनिल वाळके यांसह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.


छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांच्या काळापासून श्रीगोंदेकरांचे इमान रायगडाच्या मातीशी राहिलं आहे. श्रीगोंदे तालुक्यांतील एकमेव किल्ला धर्मवीरगड.पांडे पेडगावचा इतिहास प्रसिद्ध किल्ला बहादूरगड होय. या किल्ल्याच्या परिसरात खूप मोठा इतिहास घडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवरील अनन्वित अत्याचाराचा साक्षीदार हा किल्ला आहे. १ फेब्रु. १६८९ रोजी संगमेश्वर येथे पकडले गेले. धर्मवीरगडावर बंदी बनवून आणले. त्यानंतर परत कधीच रायगड भेट झाली नाहीं. अधुरी भेट राहिली. इतिहासाला कलाटणी मिळाली. म्हणूनच शंभुप्रेमी, शिवप्रेमींच्या मनातील प्रतीकात्मक भेट गड किल्ले संवर्धन व श्रीगोंदे येथील ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या वतीने किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड अशी रथयात्रा आयोजन केले आहे. दिनांक ८ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी महाराजांची पालखी निघाली आहे. २५० किमी. प्रवास करून ९ फेब्रुवारी रोजी रायगडवर पोहचेल. या रथ यात्रेत अनेक महीला, पुरुष, बाल मावळे व नागरिक सहभागी झाले आहेत. यानिमित्ताने गावोगावी उत्साहात स्वागत झाले. खूप मोठा जोश, उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर कोळगाव, नागेश्वर मंदिर घारगाव, श्रीगोंदयाचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज, पेडगाव येथील शौर्य स्थळाला अभिवादन करून काष्टी दौंड पुणे मार्गे पाचाडला पोहचेल. छत्रपती संभाजी महाराजांचा धीरोदात्त शौर्याचा साक्षीदार किल्ले धर्मवीरगड. शिघ्रकवी कविकलश यांची शेवटची इतिहास प्रसिद्ध रचना “यावन रावण की सभा” किल्ले धर्मवीरगड येथे घडून आली. श्रीगोंदेकरांचे इमान नेहमीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी होते. म्हणूनच राजधानी रायगडाच्या एका टोकाला छत्रपती शिवाजी महाराजांनी “श्रीगोंदे टोक” नाव दिले होते. श्रीगोंदे आणि रायगड ऋणानुबंध जपणे श्रीगोंदेकरांचे कर्तव्य आहे म्हणून किल्ले रायगड येथे धर्मवीर रथ यात्रा. सुरू केली आहे.शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ चंद्रशेखर कळमकर, आणि त्यांच्या ४१ जणांच्या शिलेदार टीमने हे शिवधनुष्य पेलले आहे.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा प्रतिनिधी)