श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ मध्ये मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला वर्गाला दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर निर्भय स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, राष्ट्रीय प्रवक्ते रमेश काकडे, कोषा अध्यक्ष सचिन पवार, महाराष्ट्र उप प्रदेशाध्यक्ष विशाल काकडे, भास्कर कुदांडे, दादासाहेब मडके, रवी डांगे, दिपक काकडे, आकाश काकडे, बबन लहाने, विकास आबा काकडे, संतोष गोरखे, शांतीलाल मदने, सुनील मदने तसेच अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज गांधीगिरीच्या मार्गाने अनोखा निषेध नोंदवण्यात आला. रस्त्यातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून ग्रामपंचायत व प्रशासनाला एक प्रतीकात्मक आणि विचार करायला लावणारा इशारा देण्यात आला.
या उपक्रमातून त्यांनी सांगितले की, “गावाचा रस्ता हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. जर प्रशासन खड्डे भरत नसेल, तर आम्ही त्या खड्ड्यांचे वृक्षारोपण करून पर्यावरणसुद्धा वाचवू आणि प्रश्नांनाही वाचा फोडू.” महिलांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या रोजच्या त्रासांची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी केली. या आंदोलनामुळे एक सकारात्मक सामाजिक संदेश दिला गेला असून निर्भय स्वराज्य पार्टीच्या या अनोख्या गांधीगिरीची गावभर चर्चा होत आहे.
प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष द्यावे, अन्यथा पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
(प्रतिनिधी – गणेश कविटकर, श्रीगोंदा)