अकोलेच्या विविध विकासकामा संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन, भाजपाचे माजी गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी घेतली भेट

अकोले – दृष्टीपथावर असणा-या नाशिक येथे भरणा-या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने अकोलेच्या विविध विकासकामा संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.तालुक्यातील पर्यटन स्थळे,रस्ते,कोकणात वाहून जाणारे पाणी पुर्वेकडे वळविणे आणि इतरही पायाभूत सुविधांच्या मागणीचे निवेदन भाजपाचे माजी गटनेते आणि भाजपाचे प्रदेश सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना दिले.


कुंभमेळा भरणा-या नाशिक जिल्ह्याच्या सीमेलगत अकोले तालुका आहे.कुंभमेळ्याच्या निमित्ताने अकोलेतील अगस्ती आश्रम,कळसुबाई, हरिश्चंद्रगड,घाटघर,भंडारदरा,अमृतेश्वर यासहित अनेक ठिकाणी पर्यटकांची वर्दळ सुरु असते.निसर्गरम्य असणा-या अकोलेचा परिसर दूरवरुन येणा-या पर्यटकांना नेहमीच खुणावतो.या पर्यटन स्थळांना जाणा-या रस्त्यांची कामे तातडीने झाल्यास रहदारीसाठी सोयीचे होईल.आवश्यक त्याठिकाणी भक्तीनिवास किंवा पर्यटक निवासाचे बांधकाम होणेही गरजेचे असून त्यानिमित्ताने आदिवासीबहूल अकोलेचा आर्थिक विकास आणि बेरोजगारी या दोन्ही प्रश्नांची उकल होण्यास मदत होईल.


पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भिमाशंकर येथून नाशिक जिल्ह्यातील सिन्नरला जाणारा रस्ता झाल्यास हे दोन्ही जिल्हे जोडले जाऊन अकोले तालुक्यातून हा प्रवास वेगवान होईल.कुंभमेळ्याच्या निमित्ताने या रस्त्याचे काम मार्गी लागल्यास दळणवळण सोयीचे आणि वेळेची बचत करणारे ठरेल असेही या निवेदनात म्हटले आहे.
अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्पात बिताका येथून पश्चिमेकडे जाणारे पाणी वळविल्यास या प्रकल्पाखालील 3914 हेक्टर क्षेत्राचे बारमाही सिंचन होण्यास मदत होईल.गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यमान समाधानकारक असल्याने हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरतो.परंतु अनावृष्टी किंवा अत्यल्प वृष्टीच्या काळात हा प्रकल्प न भरल्याने लाभक्षेत्राने दुष्काळाची दाहकताही अनुभवली असल्याने बिताक्याचे पाणी आढळेत वळविणे भविष्यासाठी गरजेचे असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.


यासोबतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि विद्यार्थ्यांना येणा-या अडचणीसंदर्भातही निवेदनात विविध मागण्या केल्या असल्याचे जालिंदर वाकचौरे म्हणाले. भाजपाचे प्रा.भानुदास बेरड, शिवाजीराव गोंदकर, गणेश जाधव आदींच्या समवेत हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

  • महाराष्ट्र राज्यातील विविध विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच सकारात्मक असतात.अकोले तालुक्यातील विविध पायाभूत सुविधांसाठीच्या निर्मितीचे निवेदनाला त्यांनी गांभीर्याने घेतले असून मागण्यांसंदर्भात दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करुन आवश्यक ती पावले मुख्यमंत्री उचलतील अशी अपेक्षा आहे.
    जालिंदर वाकचौरे
    भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *