निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे बाळासाहेब थोरातांनीच केली – खासदार शरद पवार

सत्तेसाठी अनेक पक्ष बदलणाऱ्यांनी एकेकाळचा समृद्ध राहता तालुका उध्वस्त केला आहे. ही सत्ताधार्‍यांची टोळी उध्वस्त करण्यासाठीच सौ. प्रभावती घोगरे यांच्या रूपाने जनता सरसवली आहे . निळवंडे धरण व कालव्यांची कामे ही फक्त आमदार बाळासाहेब थोरात यांनीच केली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन देशाचे जेष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार यांनी केले आहे.
राहता येथील वीरभद्र मंदिरासमोरील प्रांगणात महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.प्रभावती घोगरे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात खासदार भाऊसाहेब वाकचौरे ,मा आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, राजेंद्र फाळके ,करण ससाने, रावसाहेब म्हस्के ,सुधीर म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, ॲड. नारायणराव कारले, सचिन चौगुले, पंकज लोंढे, सुहास वाढणे, धनंजय गाडेकर, राजेंद्र बावके, आमदार रिटा चौधरी, सिमोज जगताप, सुरेश थोरात, नवनाथ आंधळे, डॉ एकनाथ गोंदकर, लताताई डांगे, शितल लहारे आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना खासदार पवार म्हणाले की, लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला मोठी ताकद दिली. यामुळे राज्य सरकार घाबरले असून फक्त घोषणाबाजी करत आहे. महिलांना पंधराशे रुपये देण्याऐवजी सुरक्षितता महत्त्वाची आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महिलांना तीन हजार रुपये तर बेरोजगार युवकांना चार हजार रुपये भत्ता देणार आहोत.
अनेक वर्ष घरात सत्ता असून राहता मतदार संघातील महत्त्वाचा नगर मनमाड रस्ता या लोकांना करता आला नाही. रस्त्यावरून गेले तर सर्वांची हाडे खिळखिळी होतात. शेती महामंडळाची जमिनीवर नॉलेज सिटी साठी उभारण्याचा प्रस्ताव मी दिला होता. पण त्याला स्वार्थासाठी येथील मंडळीने अडथळा निर्माण केला . सत्तेसाठी अनेक पक्ष बदलले. एकेकाचा समृद्ध आणि वैभवशाली असलेला राहता तालुका उध्वस्त यांनी केला. या तालुक्यात दहशतवाद करणारी टोळी निर्माण झाली असून ती जनतेने उध्वस्त करावी. असे सांगताना सौ.प्रभावती ताई घोगरे या शंकर नाना खर्डे व चंद्रकांत दादा घोगरे यांचा समृद्ध वारसा जोपासणारे असून त्या माझी मुलगीच आहे. राहता येथील शिवाजी महाराजांचा पुतळा अनेक दिवस यांनी बंद करून ठेवला आहे. सिंधुदुर्ग मधील पुतळ्याला मोदींचा हात लागला आणि तो पुतळा कोसळला. महाराजांच्या पुतळ्याचा ही भ्रष्टाचार करणारी ही मंडळी असून यांना त्यांची जागा दाखवा असे त्यांनी आवाहन केले.
तर आमदार थोरात म्हणाले की, या तालुक्यातील दहशतवाद मोडून टाकण्यासाठी ही स्वातंत्र्याची लढाई आहे .सर्वांनी सौ प्रभावती ताई घोगरे यांच्या पाठीशी उभे राहून हा तालुका गुलामगिरीतून मुक्त करावा. पेरूच्या बागा असलेला हा तालुका समृद्ध होता. परंतु कारखाना बंद झाला .बाजारपेठ उदास झाली. महागाई बेरोजगारी वाढली. हे सर्व असताना सोयाबीनचे भाव काय आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. हे सर्व सोडून जातीयतेच्या प्रश्नांवर राजकारण भाजपा नेवू पाहत आहे. सौ घोगरे यांना भाषण बंदीची नोटीस देण्यापर्यंत घाबरले की काय अशी विचारणाही आमदार थोरात यांनी केली.
तर सौ घोगरे म्हणाल्या की, पुढील पाच वर्षात मी शेतकरी आणि साई संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी भांडणार आहे .मी साधी गृहिणी असून मला कोणतेही साम्राज्य उभे करायचे नाही. पुढील पाच वर्षात निळवंडे धरणाचे पाणी सर्वांना देणे हेच काम शरद चंद्र पवार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे ,बाळासाहेब गायकवाड, नानासाहेब बावके, सचिन चौगुले, सुहास वहाडणे, यांचीही भाषणे झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *