राहुरी विधानसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला असताना महाविकास आघाडीचे उमेदवार आ.प्राजक्त तनपुरे समर्थकांकडून पुन्हा एकदा भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यकर्त्याला धमकावण्याचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील सडे गावचे तनपुरे समर्थक सरपंच धीरज पानसंबळ यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. गावातील एका सोशल मिडिया ग्रुपवर भाजपची बाजू मांडणाऱ्या कार्यकर्त्याला पानसंबळ धमकावत असल्याचे या क्लिपमध्ये ऐकू येत आहे.

पानसंबळ संबंधित भाजप कार्यकर्त्याला म्हणाले की, मी सरपंच आहे तू साधा सदस्यही नाही…तू पानसंबळचा इतिहास माहिती करून घे…जरा शांततेनं घे…तू कोणाबरोबर पण रहा, पण माझ्या नादी लागू नको. थोडं शांतीला धर जरा…तू धमकी समज नाही तर काही समज…कोणाला ऐकवायचं तर ऐकव जा. भाजप समर्थक कार्यकर्ता आपली बाजू समजून सांगत असतानाही पानसंबळ त्याला निवडणूक फक्त वीस दिवसांची आहे, मी तुला नंतर पाहून घेईल अशी धमकी देताना क्लिपमध्ये ऐकायला मिळते.
मागील काही दिवसांत राहुरी तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांवर तनपुरे समर्थकांकडून सातत्याने दहशत निर्माण करण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराचा निषेध केला आहे. निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने तनपुरे समर्थक सैरभैर झाले असून त्यांचा गुंडगिरीचा खरा चेहरा समोर येत असल्याचे भाजप समर्थक सांगत आहेत.