राहुरी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना आज बारागाव नांदूर येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेने पाठिंबा दिला असून तसे पत्र प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ खेमनर यांनी दिले.

त्याचबरोबर अण्णासाहेब बाचकर धनगर समाजाचे नेते बापूसाहेब वडितके यांचीही उपस्थिती होती. राहुरी तालुक्यामध्ये तनपुरे कुटुंबाकडून धनगर समाजाच्या लोकांना दमबाजी करण्याचा प्रकार सुरू आहे, या दमबाजीला धनगर समाजाने घाबरू नये. आपण पूर्ण ताकतीने शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना निवडून आणावे असे आवाहन अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी केले. यावेळी बारागाव नांदूर, वावरथ जांभळी आणि राहुरी परिसरातील मोठ्या प्रमाणात धनगर समाज उपस्थित होता. भाजप महायुती सरकारने धनगर समाजाला न्याय दिलेला आहे. अहिल्यादेवी घरकुल योजना त्याचबरोबर नगर जिल्ह्याचे नामांतर करून आहिल्यानगर केले. धनगरांसाठी शासनाच्या विविध योजना सुरू केल्या, महायुती सरकार नेहमी धनगर समाजाच्या सोबत आहे असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. राहुरी तालुक्यातील धनगर समाज शिवाजीराव कर्डिलेना प्रचंड मताने निवडून आणणार असा निर्धार समाजाने केला आहे. धनगर समाजाला दमबाजी करणारांना या निवडणुकीत जागा दाखवून देऊ अशी शपथ धनगर समाजाने घेतली आणि पारंपरिक पद्धतीने घोंगडी-काठी देऊन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि शिवाजी कर्डिलेंचा सत्कार केला.