07/05/2025
भारतीय सैन्यदलाची कामगिरी प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानास्पद – लोकनेते बाळासाहेब थोरात
भारतीय सैन्य दलाचे मा.प्रांताध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून अभिनंदन
संगमनेर ( प्रतिनिधी ) आतंकवाद हा मानवता धर्मासाठी सर्वात मोठा धोका असून संपूर्ण जगातील आतंकवाद हा संपलाच पाहिजे. पहेलगाम मध्ये निरापराध भारतीयांवर आतंकवाद्यांनी केलेला हल्ला हा अत्यंत निंदनीय होता. या हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी केले असून भारतीय सैनिकांची ही कामगिरी सर्व देशवासीयांसाठी कौतुकास्पद असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

ऑपरेशन सिंदूर या कामगिरीबद्दल भारतीय सैनिकांचे कौतुक करताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतीय सैन्य दलाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या शौर्य आणि पराक्रमाची प्रतिक आहे. आम्ही दहशतवाद्यांना सोडणार नाही आणि निष्पाप लोकांना मारणार नाही. ही परंपरा भारतीय लष्कराने आजही जपली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने कायम शांततेचा पुरस्कार केला आहे. मात्र पाकिस्तानी सातत्याने आतंकवादी कारवाया वाढवल्याने हे जगासाठी धोकादायक ठरत आहे. अतिरेकी किंवा आतंकवाद याला धर्म जात नसून तो मानवतेच्या विरोधात आहे आणि म्हणून तो संपवला पाहिजे. आयर्न लेडी इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकविला होता.
काश्मीर मधील पहेलगाम येथे मागील महिन्यात निरापराध भारतीयांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हा भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय होता. या हल्ल्या विरोधात भारतासह जगभरामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आणि त्याचा बदला आज भारतीय सैन्याने घेतला याचा तमाम भारतीयांना सार्थ अभिमान आहे. भारतीय सैन्यदलाचे मनापासून अभिनंदन करत असल्याचे राज्याचे माजी कृषी व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
तर जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, एकाही निष्पाप व्यक्तीला लक्ष न करता फक्त संशयित अतिरेकी तळांवर हल्ले करणे ही आपली संस्कृती भारतीय सैनिकांनी जपली आहे. ऑपरेशन सिंदूर हे तमाम भारतीयांसाठी अभिमानास्पद असून सैन्यदलाची ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचे माजी आमदार डॉ.तांबे यांनी म्हटले आहे.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, भारत हा शांतताप्रिय असा खंडप्राय देश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यावर भारताने भर दिला आहे. मात्र पाकिस्तानने कायम भारताविरोधी दहशतवादी कुरापती केल्या आहेत. पाकिस्तान मधील सर्व दहशतवादांचे स्थळ उध्वस्त झाली पाहिजे ही तमाम भारतीयांची मागणी असून भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले असून पाकिस्तानला दिलेली ही मोठी चपराक आहे. भारतीय सैन्यदल व केंद्र सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन करत असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, भारताने कायम जगाला शांततेचा मंत्र दिला आहे. आम्ही शांतताप्रिय आहोत. मात्र जर सातत्याने आम्हाला त्रास दिला तर आम्ही त्रास देणाऱ्यांना शांत करू हा संदेश भारतीय सैन्याने दिला असून भारतीय सैनिकांची ही कामगिरी तमाम युवकांसाठी अभिमानास्पद असल्याचे संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.
यावेळी भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यात आले.