जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमनेरचे जनसेवक आमदार अमोल खताळ यांनी आपल्या मतदारसंघाच्या विविध समस्या आणि गरजा अत्यंत ठामपणे मांडल्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून संगमनेरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

🔹 वेल्हाळे येथील श्री हरिबाबा देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा देण्यात यावा अशी मागणी आ. खताळ यांनी केली होती. या मागणीला यश लाभून देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर झाला आहे. हे भक्तजनांसाठी अभिमानास्पद पाऊल असून या निर्णयासाठी त्यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.
🔹 शाहीर विठ्ठल उमप व कवी अनंत फंदी यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. या मागणीला मान्यता मिळून लवकरच निधी उपलब्ध होणार आहे.
🔹 विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळा 2025 च्या पार्श्वभूमीवर मौजे पारेगाव बुद्रुक येथे पालखी मुक्कामी येणार असल्याने वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, निवारा व शौचालय यांसारख्या आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले.
🔹 अवकाळी पाऊस, चारा आणि पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचा अहवाल तातडीने वरिष्ठांकडे पाठवण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळू शकेल, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. चालू आर्थिक वर्षात विद्यूत विकासासाठी ५० कोटी रुपये, अपारंपरिक ऊर्जा विकासासाठी ४५ कोटी रुपये, लघूपाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे बांधकाम व दुरुस्तीसाठी ३२ कोटी ८२ लाख, रस्ते विकासासाठी १०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदानासाठी २५ कोटी रुपये, मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदानासाठी २५ कोटी, नगर विकासासाठी ७६ कोटी रुपये, यात्रास्थळांच्या विकासासाठी १० कोटी रुपये व पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी १९१ कोटी ९२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रोजगार निर्मिती व जिल्ह्याचे सकल उत्पादन वाढीसाठी कृषी, उर्जा विकास व पर्यटन क्षेत्राशी संलग्न प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
🔹 महादेव प्रणाली अंतर्गत पर्जन्यमापन यंत्रणा कार्यरत आहे का? याचा सविस्तर अहवाल मागवण्यास त्यांनी आग्रह धरला.
🔹 शहर व ग्रामीण भागात गौण खनिज चोरी, मटका, चोऱ्यांची वाढती प्रमाणे पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कडक कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी दिली.
🔹 पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असलेल्या गावांमध्ये टँकरची संख्या वाढवावी आणि पाण्याच्या शुद्धतेची खातरजमा करावी, अशी सूचना त्यांनी केली.
🔹 घरकुल लाभार्थ्यांकडे जमीन नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासाठी गायरान जमिनीचा पर्यायी वापर करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
🔹 नाशिक-पुणे हायवे प्रकल्पातील भूमिगत जमिनीच्या मोबदल्याच्या फाईल्स अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्या तात्काळ निकाली काढाव्यात, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
🔹 बंद पडलेली पर्जन्यमापन यंत्रे व विजेच्या धोकादायक तारा दुरुस्त करण्यास MSEB ला तातडीने सूचना देण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
या बैठकीस खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार शिवाजीराव गर्जे, नरेंद्र दराडे, मोनिका राजळे, विठ्ठलराव लंघे, डॉ. किरण लहामटे, काशिनाथ दाते, विक्रम पाचपुते यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
“संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी माझा प्रयत्न सतत चालू राहणार आहे. लोकांच्या अडचणी शासनदरबारी पोहोचवून त्याचे तातडीने निराकरण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे,” असे आ. अमोल खताळ यांनी यावेळी सांगितले.