संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील भाजप संगमनेर तालुका पूर्व मंडळाचे अध्यक्ष गुलाब भोसले यांनी आपल्या स्वखर्चातून पिंपळगाव देपा येथील हिराबाई अभंग या परिवाराला नवीन घर बांधून देत खऱ्या अर्थाने त्यांना दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करत समाजासमोर एक आगळा-वेगळा आदर्श घालून दिला असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.


संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देपा येथील अभंग परिवाराचे घर आगीत जळून खाक झाले होते, त्या परिवाराला संगमनेर तालुक्यातील पठार भागाचे नेते आणि भाजपाचे पूर्व मंडळाचे अध्यक्ष गुलाब भोसले आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा पिंपळगाव देपाचे उपसरपंच रणजीत ढेरंगे यांनी स्वखर्चा तून बांधून दिलेल्या घराचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, बाबासाहेब कुटे, आमदार किरण लाहमटे यांचे पुतणे मुकुंद लाहमटे, भाजपचे तालुकाप्रमुख गुलाब भोसले, सरपंच माऊली मिंडे, उपसरपंच आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रणजीत ढेरंगे, महिला तालुकाप्रमुख संगीता बांबळे, खांबाचे सरपंच रवींद्र दातीर, रऊफ शेख, ऍड. अमित धुळगंड, सचिन गुळवे, बाबासाहेब गुळवे, किरण गुळवे, मयूर गुळवे यांच्यासह पिंपळगाव देपा परिसरासह पठार भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुलाब भोसले यांनी त्यांच्या आयुष्यात आत्ता पर्यंत सार्वजनिक ठिकाणी खूप मदत केली असेल. मात्र एखाद्या गोरगरिबाला व्यक्तिगत मदत करण्याचे गुण त्यांच्यात असल्यामुळे त्यांनी पिंपळगाव देपाच्या अभंग परिवाराला एक चांगले घर बांधून देत वचनपूर्ती केली आहे, दिलेला शब्द ते कधी मोडत नाही त्यामुळे त्यांचं भविष्य निश्चित या भागात उज्वल राहील. जर माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याचा मुलगा तालुक्याचा आमदार होऊ शकतो तर आगामी काळात तुमच्यामधीलच कुणीतरी एखादा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा सदस्य होऊ शकतो त्यामुळे कधीही कुणालाही कमी लेखू नये असा सल्ला आमदार खताळ यांनी दिला.

साकुर पठारभागात आत्तापर्यंत आपण अनेक चारा छावण्या टाकल्या, सायकली वाटल्या असे अनेक सामाजिक कामे केली आहेत. मात्र पिंपळगाव देपा येथील अभंग परिवाराचे ज्यावेळी घर आगीत जळून खाक झाले त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील दुःखाचे अश्रु पाहून मलाही खूप वाईट वाटले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या परिवाराला स्वखर्चातून घर बांधून दिले. त्यांचा आशीर्वाद निश्चित मिळेल हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण या अभंग परिवाराला नवीन घर बांधून देण्याचे वचन दिले होते. आणि ते दिलेले वचन पूर्ण केले आहे. त्या परिवाराच्या डोळ्यांमध्ये सुखाचे अश्रू आले यातच मला खऱ्या अर्थाने समाधान आहे आणि मला या परिवाराला घरबांधून देण्यासाठी सर्वांनीच एक खारीचा वाटा उचलला त्या मुळेच मी ही वचनपूर्ती करू शकलो असे गुलाब भोसले म्हणालेत.