संगमनेर तालुक्यात मागील दोन-तीन दिवसापासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. आज संगमनेर शहरासह पश्चिम व पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस झाला असून यामुळे कांदा भाजीपाला यांसह साठवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे याचबरोबर काही जनावरे दगावली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावे अशा सूचना महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत.



आज निमगाव भोजपूर ,निमज, चंदनापुरी, वेल्हाळे, सांगवी, पेमगिरी नांदुरी, राजापूर ,चिकणी,या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. या भागामध्ये डाळिंब पीक मोठ्या प्रमाणात असून या अवकाळी पावसाने डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले याचबरोबर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांदा हा शेतीमध्ये डेपो बनवून साठवला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी साठवलेले कांद्याचे डेपो पूर्णपणे वाया गेले आहे.
याचबरोबर कोबी, फ्लॉवर यांच्या लागवडी मोठ्या प्रमाणात झाले असून, वालवड सह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे .तर काही गावांमध्ये घरांची पडजड झाली आहे. काही ठिकाणी जनावरे दगावली आहे.
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती मिळतात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या तातडीच्या सूचना दिल्या असून प्रशासनाने त्वरित सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सर्वांचे त्वरित पंचनामे करावे .याचबरोबर शासनाकडून लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी काम करावे यासाठी सूचना केल्या आहेत.
संगमनेर तालुका हा एक परिवार असून तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही अशा परिस्थितीमध्ये तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा असे आवाहन करताना याबाबत आपण स्वतः सर्व ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहोत असे सांगताना अशा संकटाच्या परिस्थितीत सर्वांनी एकजुटीने एकमेकांच्या मदतीसाठी उभे रहा असे आवाहन त्यांनी केले. यानंतर नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी त्या त्या भागातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तातडीने मदत केली आहे.
- डाळिंब, कांद्यासह टोमॅटो व इतर पिकांचे मोठे नुकसान *
तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. मात्र अचानक जोरदार आलेल्या पावसाने शेतीमध्ये साठवलेले कांद्याचे सर्व डेपो पूर्णपणे वाया गेले असून भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामध्ये सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी निमगाव भोजापूर येथील प्रगतशील शेतकरी सुनील कडलग, निमज चे उपसरपंच अरुण गुंजाळ यांनी केली आहे. - संगमनेर शहरातही तुंबली गटार *
नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे संगमनेर नवीन नगर रोड परिसरात पहिल्याच पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मोटरसायकल व गाड्याही काढता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले या सर्व परिस्थितीला नगरपालिका प्रशासनाची उदासीनता जबाबदार असल्याची टीका माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी केली आहे.