वादळवाऱ्यामध्ये झाड विजवाहक तारांवर पडले होते. त्यामुळे संगमनेर खुर्द व परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. म्हणून संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदी पुलावर पाण्याच्या टँकरची लांबच लांब रांग लागली होती. ही माहिती आ. अमोल खताळ यांना समजतात त्यांनी तात्काळ महावितरणच्या अधिकार्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले, त्यानंतर काही वेळातच वीजपुरवठा सुरळीत झाला आणि उभे असलेले पाण्याचे टँकर भरून टंचाईग्रस्त गावांना मार्गस्थ झाले.

संगमनेर पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना संगमनेर खुर्दच्या शासकीय विहिरीवरून पिण्याच्या पाण्याचे टँकर भरून पाठवले जातात. सध्या सर्वत्र वादळवाऱ्यासह पाऊस चालू आहे, रविवारी सायंकाळी झालेल्या वादळ वाऱ्यामुळं झाड उन्मळून विजवाहक तारांवर पडले होते. त्यामुळे वीजवाहक तारा तुटल्या होत्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महावितरणने संगमनेर खुर्द परिसरातील वीजपुरवठा खंडित केला होता. वीजपुरवठा खंडित असल्यामुळे संगमनेर खुर्दच्या शासकीय विहिरीवर पाण्याचे टँकर भरले गेले नाही. त्यामुळे संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदीच्या छोट्या पुलावर टँकरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
ही माहिती आ. अमोल खताळ यांना समजली मात्र ते अहिल्यानगर येथे एका बैठकीसाठी गेले होते, त्यामुळे त्यांनी तात्काळ बंधू राहुल खताळ यांना संगमनेर खुर्द येथे पाठवले, खताळ यांनी संगमनेर खुर्दच्या शासकीय विहिरीवर जाऊन टँकर का उभे राहिले ? याची माहिती घेतली असता झाड पडले असल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती मिळाली. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोनवरून वरून माहिती देत वीजपुरवठा सुरळीत करा आणि पाण्याची टँकर भरण्याची व्यवस्था करा असे सांगितले. त्यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटातच वीज पुरवठा सुरळीत झाला, आणि एकामागे एक पाण्याचे टँकर भरून टंचाईग्रस्त गावाकडे मार्गस्थ झाले.