संगमनेरकरांनी जागवल्या स्व.विलासराव देशमुख यांच्या आठवणी, यशोधन कार्यालय येथे जयंतीनिमित्त अभिवादन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा बहुआयामी व्यक्तिमत्व विलासराव देशमुख आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात योगदान देणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणी संगमनेरकरांनी जागवल्या असून जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे कमिटीचे सदस्य माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात जयंतीनिमित्त स्वर्गीय विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सुरेशराव थोरात,सुरेशराव झावरे,प्रा.बाबा खरात, मुख्याधिकारी नितीन भांड, रामदास तांबडे,तात्याराम कुठे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.


महाराष्ट्राच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय विलासराव देशमुख यांची ओळख असून हजारजबाबीपणा, विविध भाषांवर प्रभुत्व, रुबाबदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व लाभलेल्या विलासराव देशमुख यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर बंधुवत प्रेम केले. तालुक्याच्या विकासासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना कायम पाठबळ दिले. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री पद माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भूषवले होते.
तर संगमनेर शहरासाठी निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन ऐतिहासिक योजना विलासराव देशमुख यांनी अवघ्या दोन मिनिटांमध्ये माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मागणीवरून मंजूर केली होती.त्यामुळे शहरवासीयांना मुबलक व स्वच्छ पाणी मिळत आहे. काँग्रेस पक्षातील अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्त्वाची महाराष्ट्राला कायम भुरळ राहिली असून संगमनेर करांनी त्यांच्या आठवणी जागवले आहेत.


यावेळी बोलताना प्रा.बाबा खरात म्हणाले की, महाराष्ट्राचे उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून जेव्हा विलासराव देशमुख यांचा उल्लेख होतो त्यामध्ये त्यांचा मोठेपणा सर्वांना जाणवतो. विविध क्षेत्राची त्यांना जाण होती कायम हसतमुख असलेल्या या रुबाबदार व्यक्तिमत्वाने सरपंच ते केंद्रीय मंत्री असा मोठा केलेला प्रवास हा काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे.
तर सुरेश थोरात म्हणाले की, काँग्रेस विचारांची परंपरा ही विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रात रुजवण्यात मोठा वाटा उचलला. त्यांचे योगदान महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहील असे ते म्हणाले. यावेळी विलासरावांच्या विविध आठवणींना उजाळा देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *