संगमनेर तालुक्यातील निमज गावची ग्रामसभा वादळी ठरली, या ग्रामसभेला ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यांपैकी केवळ ३ सदस्यच उपस्थित होते. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या विविध विषयांवर वादळी चर्चा झाली तर सरपंच गैरहजर होते.

संगमनेर तालुक्यातील निमज ग्रामपंचायतीच्यावतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, या विशेष ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीच्या ताब्यातील मिळकतींवर काही नातेवाईकांचे बेकायदेशीर अतिक्रमण असून यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही .गावठाणातील मंदिरासमोरील रस्ते नागरिकांच्या अतिक्रमणामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत, नव्या विकासकामांसाठी कोणतेही नियोजन किंवा जनतेचा सहभाग घेतला जात नाही. जुनी आस्थापनेच पुनर्प्रस्थापित करून चुकीच्या पद्धतीने, लोकशाहीला डावलून काही स्वयंघोषित पुढाऱ्यांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे, जलजीवन योजनेच्या अंतर्गत पाईपलाइन मोकळ्या अवस्थेत असून त्यांच्यामुळे सार्वजनिक रस्ते खराब अवस्थेत आहेत. रस्ते हे लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेले असूनही सरकारी यंत्रणांकडून कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही. बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांतून आजपर्यंत एक थेंबही पाणी मिळालेले नाही. त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे.
ग्रामसभेत नागरिकांकडून पुराव्याची मागणी करताच काही लोकांनी अरेरावीची, दादागिरीची भाषा वापरून गावकरी लोकांना गप्प बसवले तर बस स्टॅन्ड माजी खासदार स्वर्गीय पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून झालेले असूनही माजी आमदारांचे नाव लावण्यात आले. याबाबत कोणताही पुरावा दाखवण्यात आलेला नाही .ग्रामसभेत स्पष्टपणे “आम्ही नाव काढणार नाही” असे सांगण्यात आले व नागरिकांना अत्यंत गलिच्छ भाषेत सुनावले गेले. बिबट्यांचा संचार असतानाही स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहेत. वेळोवेळी तोंडी व लेखी निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही होत नाही. गावातील काही रस्ते नकाशावर दाखवले जात नाहीत. जीआर असूनही कोणतीही कारवाई होत नाही. गावातील पाणी टाकी गेल्या 5-6 वर्षांपासून लिकेज स्थितीत असून वेळोवेळी सांगूनही दुरुस्ती न करता टाळाटाळ केली जाते अशा विविध विषयांनी हि ग्रामसभा गाजली.