निळवंडे धरण हे आपल्या जीवनातील ध्यासपर्व मानून आपण सातत्याने काम केले. मंत्रिमंडळात विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून धरण व कालव्यांच्या कामासाठी निधी मिळवला व काम सुरू ठेवले. आता उजव्या व डाव्या कालव्यातून आलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्याने स्वप्नपूर्ती झाली असून कालव्यांच्या वरील भागातील जे शेतकरी आहेत त्यांनाही पाणी देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच असल्याचे प्रतिपादन कालव्यांचे निर्माते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

घुलेवाडी येथे जलपूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी सरपंच सौ.निर्मला राऊत, नवनाथ आरगडे, भाऊसाहेब पानसरे,तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब पानसरे, भास्कर पानसरे,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ कार्यकर्ते व युवक कार्यकर्ते तसेच घुलेवाडी वि.का.सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, पतसंस्था, तंटामुक्ती व गावातील सर्व युवक संघटनांचे पदाधिकारी या पाण्यासाठी मेहनत घेतलेले सर्व शेतकरी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी गावातील तरुणांनी वाजत गाजत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भव्य मिरवणूक काढून भेंडाळे बंधारा येथे साडीचोळी अर्पण करून पाण्याचे पूजन केले.


यावेळी माजी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी आल्याने संगमनेर तालुक्यात आता जलसमृद्धी निर्माण झाली आहे. अनेक गावांना या धरणाचे पाणी मिळाले असून कालव्यांच्या वरच्या बाजूस असलेल्या उर्वरित शेतकऱ्यांनाही पाणी मिळवून देण्यासाठी आपण नियोजित आराखडा तयार केला सत्ता बदलली तरी या कामाचा आपला सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. दुष्काळी भागातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देणे हे आपले स्वप्न असून त्यासाठी काम करत आहोत. आवश्यक तेथे थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विविध गावांमध्ये आपली यंत्रणा देऊन चारी खोदून बंधारे भरून देण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी पाईप देऊन पाणी उचलले गेले आहे. आणि शक्य तिथपर्यंत पांणी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.
तर सरपंच सौ राऊत म्हणाल्या की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच निळवंडे धरणाचे पाणी डाव्या व उजव्या कालव्यातून सर्वांना मिळाले आहे.
तर नवनाथ आरगडे म्हणाले की, धरण व कालव्यांची काम हे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले मात्र दुर्दैवाने शेवटच्या काही दिवसात सत्ता परिवर्तन झाले आणि या कामात ज्यांनी अडथळे निर्माण केले, ज्यांचे या कामात काही योगदान नाही ती आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे मात्र जनतेला माहित आहे धरण व कालव्यांची कामे कोणी पूर्ण केली.
याप्रसंगी गावातील अनेक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करत पाणी मिळवून दिल्याबद्दल माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी घुलेवाडी परिसरातील अनेक नागरिक, युवक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.