संगमनेर – खरीप हंगामासाठी सरकारने संगमनेर तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणावर युरिया खताचा पुरवठा केला आहे. मात्र काही ठिकाणी युरिया मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तालुक्यातील शेतकरी युरिया खतापासून वंचित राहणार नाही याची दक्षता कृषी अधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहे.

संगमनेर तालुक्यात युरिया खताचा पुरेसा पुरवठा असतानाही शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असल्याने या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सर्व कृषी सेवा केंद्र सहकारी संस्था यांचा समन्वय साधून युरियाचा साठा निश्चित करा, शेतकऱ्यांना तांत्रिक कारणाने युरिया खत मिळण्यास काही अडचणी येत असेल तर त्यावर तात्काळ उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्यावे. कृषी सेवा केंद्र चालक अगर सहकारी संस्था युरिया असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- संगमनेरच्या कृषी विभागाला आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली ४११ मेट्रिक टन युरिया खत प्राप्त झाले होते.त्यातील २०५ मेट्रिकटन युरिया खताचे वितरण पूर्ण झाले आहे. संपूर्ण तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रे आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे.
- संगमनेर तालुक्यात काही ठिकाणी युरिया टंचाई असल्याच्या विनाकारण अफवा पसरविल्या जात आहेत. मागणी नुसार पुरवठा होत आहे, शेतकऱ्यांनी चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कुठे अडवणूक होत असेल तर संपर्क कार्यालयात कळवावे असंही आवाहन आमदार अमोल खताळ यांच्याकडून करण्यात आलं आहे.