नाशिक जिल्ह्यातील जातेगावच्या कल्पना आणि कैलास दामू उगले दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसमवेत विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो किलोमीटरचे अंतर पायी चालत निघालेल्या संत महात्म्यांच्या पालख्या शनिवारी पंढरपूरच्या विठ्ठल नगरीत दाखल झाल्या, वैष्णवांची मांदियाळी आणि हरिनामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली होती. आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्र व इतर राज्यातून तब्बल १५ लाखांहून अधिक वारकरी पंढरीच्या विठ्ठल दर्शनासाठी दाखल झाले आहेत. शनिवारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरीच्या नगरीत दाखल झाले त्यांनी सर्वप्रथम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज व इतर संतांच्या पालखीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला, त्यानंतर त्यांनी स्वतः माऊलीच्या पालखीत सहभागी होत पालखीला खांदा दिला. रविवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक पंढरीच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले आणि त्यांची पत्नी कल्पना कैलास उगले यांना मुख्यमंत्र्यांसमवेत शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. उगले दाम्पत्य गेल्या १० ते १२ वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत. आषाढी एकादशीच्या दोन दिवस अगोदर संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ पाटील आणि नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी पांडुरंगाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला.

विठ्ठल नामाचा जयघोष प्रत्येक वारकऱ्याच्या मुखातून निघत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत सोपानकाका, संत चोखामेळा, संत बाळूमामा, संत गजानन महाराज, संत गंगागिरी महाराज यांच्यासह अनेक संतांचे पालखी सोहळे शुक्रवारी रात्रीच मुक्कामी दाखल झाल्या होत्या. शनिवारी सकाळी या पालख्या पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अखेरचा रिंगण सोहळा दुपारी वाखरी येथे पार पडला. त्यानंतर संत मुक्ताई आणि संत नामदेव महाराज यांच्यासह मानाच्या पालख्या वाखरी येथे दाखल झाल्या. सर्व संतांची भेट झाली. त्या नंतर क्रमाक्रमाने एक एक करत सर्व संत महंतांच्या पालख्या पंढरीकडे मार्गस्थ झाल्या.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी येथून पुढे रथातून मार्गस्थ झाली. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेकडो दिंड्या सहभागी असलेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या नगरीमध्ये दाखल झाली, अत्यंत शिस्तीमध्ये सर्व वारकरी माऊली माऊली, ज्ञानबा तुकाराम असा जयघोष करत चंद्रभागेच्या दिशेने रवाना झाली, या दिंड्यांमध्ये हजारोच्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते, पंढरीत दाखल झालेल्या सर्व पालख्यांनी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालत आपापल्या ठिकाणी स्थिरावल्या. लाखोंच्या संख्येने भाविक भक्ताने चंद्रभागेच्या तिरी स्नान करत आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले, संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकभक्त पंढरीमध्ये दाखल झाले. विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ज्या भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता आले नाही त्यांनी कळसाचे दर्शन घेऊन माघारी परतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *