संगमनेर – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने शेतकरी ऊस उत्पादक व कामगार यांच्या जीवनात आनंद निर्माण करताना उच्चांकी भाव दिला आहे. महाराष्ट्रात ऊस शेती क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून आपल्या कार्यक्षेत्रात ऊस वाढ कार्यक्रमांतर्गत नव्याने एआय वापरासाठी प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्यात येणार असून यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी केले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता एआय प्रणाली बाबत अधिक माहिती देताना घुले म्हणाले की, जागतिक स्तरावर शेती आरोग्य व शिक्षण या क्षेत्रामध्ये ए आय चा वापर वाढला आहे. ऊस शेती मध्ये बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्टने याचा वापर केला असून जमिनीच्या पोतानुसार आवश्यक खते ,उसावर आलेले बुरशी, कीटकनाशके यांचा करावयाचा वापर याबाबतची माहिती तात्काळ शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मिळेल .त्याचबरोबर उसाच्या फुटव्यांची संख्या ,त्यांची वाढ समान ठेवण्यात यश मिळेल. या पद्धतीमुळे अंदाजे ऊस उत्पादनात 30 ते 40 टक्के वाढ होऊन पाण्याची 30 टक्के बचत होते. खते ,रोग व कीड नियंत्रण औषधांच्या खर्चामध्ये 40 ते 50 टक्के बचत होते असे प्रायोगिक तत्त्वावर सिद्ध झाली आहे .
थोरात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करण्यात येणार यासाठी 25 शेतकऱ्यांचे समूह गट तयार करण्यात येणार आहे. गटनिहाय ऊस पीक प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्यात येणार आहेत .यामध्ये त्या भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक सहभाग असणार आहे. याचबरोबर ही प्रणाली पूर्व हंगाम व सुरु हंगामाकरता राहणार असून शेतकरी हा ऊस नियमित पिकवणारा, अँड्रॉइड मोबाईल वापरणारा आणि दिलेल्या सूचनांचे पालन करणारा असावा.
त्याचप्रमाणे भरपूर पाणी जरी असले तरी ठिबक सिंचन चा वापर करणे अनिवार्य असणार आहे
याबाबतच्या अधिक माहितीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेती व ऊस विभागाशी संपर्क करावा किंवा गट ऑफिसमध्ये आपली नाव नोंदणी 20 जुलै 2025 पर्यंत करावी असे आवाहन सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक मंडळांनी केले आहे.