गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ.जयश्री थोरात यांचा संगमनेर-शिर्डी पायी दिंडीत सहभाग

जगप्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री.साईबाबांच्या शिर्डी येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो. या उत्सवासाठी राज्यासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येने येत असून डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील युवक व महिलांनी पायी दिंडीत सहभाग घेऊन साई भक्तांची सेवा केली आहे.

संगमनेर ते शिर्डी दरम्यान तालुक्यातील युवकांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी पायी चालत साई भजन गात सहभाग घेतला. पुणे पश्चिम महाराष्ट्र,कोकण आणि मुंबई विभागातून अनेक दिंड्या संगमनेर मार्गे येत असून या दिंड्यांच्या समवेत युवक व महिला कार्यकर्त्यांनी पायी दिंडी काढली. याचबरोबर डॉ.जयश्रीताई थोरात यांनी या दिंडीमध्ये सहभाग घेत विविध साई भक्तांना प्रसाद वाटप, आरोग्य तपासणी, यांसह विविध व्यवस्थांमध्ये सहभाग घेतला.

यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, श्रद्धा आणि सबुरीचे प्रतीक असलेले साईबाबा हे सर्वांचे श्रद्धास्थान आहे. संगमनेर तालुक्यासह राज्यभरातील लाखो भक्तांची साईबाबांवर मोठी श्रद्धा असून गुरुपौर्णिमा निमित्त तीन दिवस शिर्डीमध्ये मोठा उत्सव असतो यासाठी राज्यभरातून लाखो साईभक्त येत असतात. संगमनेर वरून अनेक साई भक्त येत असताना लोकनेते मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या भक्तांना विविध सुविधा दिल्या जातात.

दिंडीमध्ये सर्व लोक एकत्र मिळून मिसळून गुण्या गोविंदाने साई भजन गात असतात. पायी दिंडी ही महाराष्ट्राची मोठी संस्कृती असून यामध्ये भेदभाव नसतो. सर्व धर्म समभाव जपत सर्वजण एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात. आषाढी श्रावणाच्या सरी,रिमझिम पाऊस,सर्वत्र हिरवाई आणि साईनामाचा गजर असा हा सुंदर सोहळा जीवनातील अविस्मरणीय ठेवा असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी विविध ठिकाणी त्यांनी साई भक्तांना खिचडी व प्रसादाचे वाटप केले याचबरोबर अनेकांचे आरोग्य तपासणी केली. संगमनेर मधील युवक, महिला आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी या दिंडीमध्ये सहभाग घेऊन शिर्डीतील उत्सवात येणाऱ्या साई भक्तांची सेवा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *