राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात नागरदेवळे (ता. नगर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (गावठाण) मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी एका व्यक्ती विरोधात दुबार मतदानाचा आक्षेप नोंदविला. यावेळी भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मतदान केंद्रावर दगडफेक केली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगविला. त्यानंतर आमदार तनपुरे मतदान केंद्राबाहेर पडले.
नागरदेवळे (ता. नगर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (गावठाण) येथे २८१ ते २८४ बुथवर बोगस मतदान सुरू असल्याची माहिती आमदार तनपुरे यांना मिळाली. त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजता मतदान केंद्रावर धाव घेतली. तनपुरे यांच्या मतदान प्रतिनिधीने एक व्यक्ती दुबार मतदान करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर आमदार तनपुरे यांनी विहित नमुन्यात अर्ज करून आक्षेप नोंदविला.
त्याची माहिती वेगाने गावात पसरली. भाजपचे उमेदवार माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे शेकडो कार्यकर्ते मतदान केंद्रावर जमले. यावेळी आमदार तनपुरे मतदान केंद्रामध्ये होते. कार्यकर्त्यांच्या जमावाने प्रचंड घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राच्या शाळेच्या पत्र्यावर दगडफेक केली. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सौम्य लाठीमार केल्यावर जमाव पांगला. त्यानंतर आमदार तनपुरे मतदान केंद्राबाहेर पडले.