आजच्या काळात आपण सभोवतालच्या परिस्थितीवर नजर टाकल्यास दोन परस्परविरोधी वास्तव आपल्याला स्पष्टपणे जाणवतात. एकीकडे निसर्गाचे अनमोल सौंदर्य, त्याची संपन्नता, आणि मानवी जीवनाला दिलेला आधार लक्षात येतो. तर दुसरीकडे, निसर्गाचे ढासळलेले रूप, त्याचे वेदनादायक आक्रंदन, आणि त्याच्यावर झालेल्या मानवी अत्याचारांचे दाहक चित्र समोर येते. प्रदूषित नद्या, वाढती जंगलतोड, विषारी हवामान आणि ओसाड माळराने या सर्व गोष्टींच्या माध्यमातून निसर्ग आपल्याला धोक्याचा इशारा देतोय: “बाबा, आता थांबा! माझा विनाश रोखा. मी अधिक काळ ही अवस्था सहन करू शकत नाही.” जर आपण आत्ताच ही जाणीव केली नाही, तर पुढच्या पिढ्यांना आपण फक्त उजाड आणि भकास पृथ्वीच वारसा म्हणून देऊ.हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, जल आणि वायू प्रदूषण, जैवविविधतेचा ऱ्हास या समस्या आता कोणत्याही एका देशापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. या समस्या जागतिक पातळीवर प्रत्येक कुटुंबाला वेढून बसल्या आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या कोणत्याही प्रयत्नांत एकमेकांशी समन्वय आवश्यक आहे. ही लढाई फक्त तज्ज्ञ, संस्था, पर्यावरणतज्ज्ञ किंवा सरकार यांचीच नाही, तर ती प्रत्येक व्यक्तीची आहे. विशेषतः तरुणाईची, कारण तरुण हे समाजाचे उमेद आणि भविष्य आहेत.
आजच्या तरुणांकडे निसर्गासाठी काम करण्याची जबरदस्त क्षमता आहे. त्यांच्यात अमर्याद ऊर्जा, आधुनिक दृष्टिकोन, आणि नाविन्यपूर्ण विचार आहेत. हे तरुण फक्त आजचे सजग नागरिक नाहीत, तर उद्याचे सक्षम नेतृत्व आहेत. पर्यावरण संकट ही केवळ एक समस्या नाही, तर मानवी अस्तित्वासाठी मोठा धोका आहे. जर तरुणाई आत्ताच सज्ज झाली, तर ही पृथ्वी भविष्यातही जीवनदायिनी राहील. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की पर्यावरण संरक्षण ही एखाद्या उत्सवापुरती गोष्ट नाही; ती एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे.


आपली धरतीमाता जी आपण आई मानतो, तिच्यावर आपण प्रेमाचा आणि आधाराचा भार ठेवतो. तिच्या साधनसंपत्तीचा मनमुराद उपभोग घेतो. परंतु आपण तिच्या बदल्यात काय दिले? गेल्या काही दशकांपासून विकासाच्या नावाखाली आपण जंगलतोड, शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाने तिच्या पोषणस्रोतांवर आक्रमण केले आहे. औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, हवामान चक्र विस्कळीत होत आहे, आणि हिमनद्या वितळत आहेत. त्यामुळे समुद्राच्या महापुरांपासून ते दुष्काळ आणि जंगलातील आगीपर्यंत अनेक आपत्ती अधिक तीव्र होत आहेत. जैवविविधतेचा ऱ्हास, जलसंकट, आणि ग्लोबल वॉर्मिंग आता केवळ वैज्ञानिक चेतावणी नसून, भीषण वास्तव बनले आहे.
या समस्यांचा फटका फक्त पर्यावरणालाच नाही, तर मानवी समाजालाही बसतोय. पर्यावरणीय आपत्तींच्या परिणामांमुळे जागतिक अर्थव्यवस्थांवर प्रचंड ताण येत आहे. वायू आणि जलप्रदूषणामुळे लाखो लोक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. हवामान बदलामुळे अनेक लोकांना आपली घरे सोडावी लागत आहेत. निसर्गाच्या संतुलन बिघड्यामुळे गरीब आणि वंचित समाजांवर प्रचंड परिणाम होत आहे. मात्र हे बदल घडवण्याची ताकद आजच्या तरुणाईमध्ये आहे.
तरुण हे नेहमीच समाजाचा सशक्त वर्ग मानले गेले आहेत. त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशेने वळवले, तर ते परिवर्तनाचे वाहक बनू शकतात. आजचा तरुण सोशल मीडियाच्या मदतीने जागृती निर्माण करू शकतो. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याची साधने आहेत. उदाहरणार्थ, ग्रेटा थनबर्ग या १६ वर्षीय तरुणीने “फ्रायडेज फॉर फ्युचर” चळवळ सुरू करून जागतिक स्तरावर लाखो तरुणांना प्रेरणा दिली. वांगारी मथाई यांच्या “ग्रीन बेल्ट मूव्हमेंट”ने केवळ झाडे लावून पर्यावरणच नव्हे, तर स्थानिक महिलांनाही सशक्त केले. ब्रिटनमधील लिझी कारने “प्लॅनेट पेट्रोल” या संस्थेची स्थापना केली, जी नद्या आणि समुद्र प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्त करण्यावर लक्ष केंद्रित केले.गिरीश पाटील यांनी भारतात “युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया”च्या माध्यमातून पवना नदी संवाद यात्रा, रिव्हर क्लब अशा उपक्रमांतून जनजागृती केली.यासारख्या उदाहरणांमधून हे स्पष्ट होतं की, तरुणांची इच्छाशक्ती आणि ध्येयवादी दृष्टिकोन हे खऱ्या बदलाची नांदी ठरू शकतात.तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक मोठा बदल छोट्या कृतींनी सुरू होतो. उदाहरणार्थ, प्रत्येक तरुणाने एक झाड लावल्यास काही वर्षांतच लाखो झाडांचे जाळे निर्माण होईल. प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरणे, सार्वजनिक वाहतूक, सायकलिंग किंवा सौर ऊर्जा वापरणे अशा साध्या गोष्टींचा मोठा परिणाम होईल.
जर आपण आज पर्यावरणाचा विचार केला नाही, तर येणाऱ्या पिढ्यांना पाणी, हवा, आणि अन्न यांसाठी संघर्ष करावा लागेल. पर्यावरण संरक्षण ही आत्ता फक्त एक चळवळ नाही, तर मानवी अस्तित्वाचा प्रश्न आहे. नैसर्गिक संकटांचा परिणाम समाजातील सर्वच स्तरांवर होतो, पण गरीब आणि वंचित घटकांना याचा सर्वाधिक फटका बसतो. या असमानतेला दूर करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र, ही जबाबदारी फक्त तरुणांवर टाकून चालणार नाही. सरकार, सामाजिक संस्था, आणि समाजातील प्रत्येक घटकाने या प्रयत्नांना पाठबळ द्यायला हवे.
सरकारने शाळा-कॉलेजांत पर्यावरण शिक्षण बंधनकारक करणे, हरित रोजगाराच्या संधी निर्माण करणे, आणि पर्यावरणीय चळवळींना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तरुणांच्या प्रयत्नांना योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा दिल्यास मोठे परिवर्तन घडू शकते.”ही आपली धरती आहे, आपली जबाबदारी आहे. तिचं संरक्षण हेच आपल्या भविष्याचं रक्षण आहे.”
दिव्या भोसले