श्रीगोंद्यात १७ ते १९ जानेवारी कालावधीत व्याख्यानमाला

श्रीगोंदा तालुक्याच्या आर्थिक , शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकासाबरोबर सामाजिक उन्नती व वैचारिक उंची वाढविण्यासाठी लोकनेते शिवाजीराव नागवडे बापू प्रतिष्ठान व श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व्या वर्षाची व्याख्यानमाला दि. १७, १८ व १९ जानेवारी रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 

प्रसिद्धी पत्रकात डॉ. सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते, एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचारांचा व कार्यकर्तृत्वाचा परिचय येणाऱ्या पिढीला व्हावा, त्यांचा वसा आणि वारसा पुढे निरंतर चालत राहावा तसेच निकोप, प्रगल्भ व सुसंस्कृत समाजाची निर्मिती व्हावी आणि मानवतेची उंची वाढवावी या उदात्त हेतूने संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या कुशल मार्गदर्शना खाली गेली १६ वर्षापासून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील थोर विचारवंतांच्या, समाजचिंतकांच्या अमृतवाणीचा जागर या व्याख्यानमालेच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. 

            या व्याख्यानमालेच्या १७ व्या वर्षाची सुरुवात शुक्रवार दिनांक १७ रोजी होत आहे. सकाळी १०:३० वाजता प्रेरणादायी वक्ते युवराज पाटील हे “उद्याच्या उज्वल भविष्यासाठी” या विषयावर व्याख्यान देणार असून अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे या असणार आहेत.  दुसरे पुष्प शनिवार दि. १८ रोजी सकाळी १०:३० वाजता “श्री. छत्रपती शिवाजी महाराज व आजचा महाराष्ट्र” या विषयावर सुप्रसिद्ध शिवव्याख्याते श्री. अफसर शेख हे गुंफणार असून सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस हे असणार आहेत.  तिसरे पुष्प रविवार ते १९ रोजी सकाळी १०:३० वाजता माजी सनदी अधिकारी तथा शिवम प्रतिष्ठान कराडचे अध्यक्ष श्री. इंद्रजीत देशमुख हे ” माणूस म्हणून जगताना” या विषयावर गुंफणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सह.सा. का ली. चे चेअरमन तथा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे भूषविणार आहेत. या सर्व कार्यक्रमास संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ सदस्य व तालुक्यातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दरम्यानच्या काळात शुक्रवार दिनांक १७ रोजी दुपारी दोन वाजता रांगोळी स्पर्धा, सलाड मेकिंग, पाककला, मेहंदी स्पर्धा व आनंदी बाजार आहे. तर शनिवार दि. १८ रोजी लोकनेते शिवाजीराव बापू नागवडे यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ८-३० वा. प्रभात फेरी, दुपारी दोन वाजता एकांकिका व बॉलीवूड डे तसेच रविवार दि. १९ रोजी सकाळी आठ वाजता रक्तदान शिबिर व दुपारी दोन वाजता फनी गेम्स आहेत. सोमवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व दुपारी दोन वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून वैचारिक मेजवानीचा आनंद घ्यावा व महाविद्यालयाच्या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी, संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड व महाविद्यालय व्यवस्थापन कमिटीने केले आहे. 

प्रतिनिधी – गणेश कविटकर, श्रीगोंदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *