संगमनेर तालुक्यातील पठारभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. पोखरी बाळेश्वर येथील सुकन्या कु. वैष्णवी दिगंबर फटांगरे हि क्लासवन ऑफिसर झालीये. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून (MPSC) तिची असिस्टंट आरटीओ म्हणून निवड झालीये. २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेचा काल गुरुवारी ८ मे २०२५ रोजी निकाल लागला आणि त्यामध्ये वैष्णवीने हे घवघवीत यश संपादन केलंय. विशेष म्हणजे संपूर्ण राज्यातून महिला ओबीसी मधून ती प्रथम आलीये. निकाल लागल्यानंतर संपूर्ण तालुकाभरातुन वैष्णवीवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

वैष्णवी फटांगरे हिने ME चं शिक्षण घेतलेलं असून त्यानंतर तिने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला होता. त्यात तिने या याअगोदरही घवघवीत यश मिळवलं असून सध्या ती राज्य विक्रीकर निरीक्षक पदावर कार्यरत देखील आहे. मात्र तिने एवढ्यावरच न थांबता अभ्यास सुरूच ठेवला आणि त्यातूनच आता ती क्लासवन परीक्षा उत्तीर्ण होऊन असिस्टंट आरटीओ म्हणून तिची निवड झालीये.

वैष्णवी हि पोखरी बाळेश्वर येथील सोमनाथ विष्णू फटांगरे गुरुजी आणि गंगुबाई फटांगरे यांची नात असून शिक्षक दिगंबर सोमनाथ फटांगरे आणि शिक्षिका सुनीता फटांगरे यांची मुलगी आहे. हे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित असल्याने पहिल्यापासूनच तिच्यावर या कुटुंबाचे चांगले संस्कार झालेत तर त्याचाच परिपाक म्हणून आणि तिने केलेला नियमित अभ्यास या जोरावर वैष्णवीने हे घवघवीत यश संपादन केलंय.