माघारी जाणारा निधी वेळेत खर्च केल्याचं काही जणांना देखवत नाही – शिवसेना शाखाप्रमुख शरद पानसरे यांची काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्यावर टीका

काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच हे टक्केवारीच्या नादामध्ये हा निधी शासनाकडे परत जाण्याच्या मार्गावरती असताना आमदार अमोल खताळ यांनी हा निधी घुलेवाडी गावात वेळेत खर्च करण्यासाठी पुढाकार घेतला आणि तो निधी घुलेवाडीच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधारण्यासाठी, जनतेच्या विकासासाठी खर्च करण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न केले, हे पात्रता नसलेल्या आणि काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्याला तसेच त्यांच्या बगलबच्चांना देखवत नसल्याची टीका घुलेवाडी शिंदे शिवसेना शाखेचे प्रमुख शरद पानसरे यांनी केली.


याबाबत घुलेवाडी शिवसेना शाखेचे प्रमुख शरद पानसरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी पंचायत समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामविकास अधिकारी यांचा समन्वय साधून प्रामुख्याने लक्ष घातले. त्यानंतर या कामांना गती देण्यात आली. घुलेवाडी गावात आकाच्या सांगण्यावरून मनमानी कारभार सुरु असून साम, दाम, दंड, भेद या सर्व गोष्टींचा वापर हे काँग्रेसचे पुढारी करत आहेत,सर्व सामान्य जनतेला वेठीस धरत आपल्या फायद्यासाठी गावाला आणि ग्रामस्थांना विकासापासून वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे. प्रत्येक कामाचे श्रेय आपल्यालाच मिळेल यासाठी ते सर्वात पुढे असतात. सध्या घुलेवाडी गावामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून होत असलेला विकास काँग्रेसचे काही नेते आणि त्यांच्या बगलबच्चांना देखवत नाही. जनतेने त्यांना घरी बसवले तरी त्यांच्यात सुधारणा होत नाही. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी वेळोवेळी गावाला वेठीस धरले आहे. प्रत्येक गोष्टी शिवाय कुठलंच काम घुलेवाडी गावात करायचं नाही, असे जन्मताच कपाळावर लिहून आलेले काही महाभाग घुलेवाडीत आहे. मागील 40 वर्षापासून लाभार्थी यादीत सर्वात पुढे या महाशयांचे नाव असते घुलेवाडी गावाच्या विकास कामाच्या संदर्भात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला तर त्यांना दमदाटी, शिवीगाळ, मारहाण करणे असे अनेक प्रकारचे दबाव तंत्र हे नेहमी वापरत आले आहेत. गावातील गोरगरीब जनतेला मारहाण करणे, दहशतीचे वातावरण तयार करून आपण सांगू तीच पूर्व दिशा अशा प्रकारचा मनमानी कारभार करून त्यांनी मलिदा कमावलेला आहे. मात्र याकडे माजी लोक प्रतिनिधींचे अजिबात लक्ष नाही, काहीही घडलं तरी आम्ही माजी मंत्र्यांची माणसं आहोत, त्यांच्या नावाने वेळोवेळी पावती फाडणे, आपला स्वार्थ साधून घेणे या पलीकडे या महाशयांनी काही केलेच नाही.


गावात अनेक प्रकारचे अवैध धंदे यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत, पण यापुढे बगलबच्चाने लक्षात ठेवावे हे सरकार महायुतीचे आहे, सर्वसामान्य जनतेचे आहे, येथे चुकीचे काम चालणार नाही, न खाऊंगा न खाने दुंगा या पद्धतीनेच सर्वसामान्यांचे कामे होतील असे घुलेवाडी शिंदे शिवसेना शाखा व महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *