संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांनी १५ व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या पाण्याच्या टाक्या स्वतःच्या फायद्यासाठी घरासमोर बांधल्या असून त्या त्वरीत बंद करून साळवे आणि नाईक वस्तीत बांधण्यात याव्या यासाठी पाटीलभाऊ सटवा कुदनर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दि. २९ मे पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सरपंच व उपसरपंचाच्या या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, शिंदोडी गावामध्ये १५ व्या वित्त आयोगातून दोन पाण्याच्या टाक्यांचे काम सुरू असून एक टाकी खामकर वस्ती येथे आणि दुसरी टाकी चोंडी वस्ती येथे सुरू आहे. या दोन्ही टाक्या सरपंच व उपसरपंच यांचे घरासमोर आहे. परंतु काम सुरू होऊन तीन आठवडे झाले असून या जागेचे कोणतेही बक्षीसपत्र अजून झालेले नाही. ज्या ठिकाणी या टाक्या आहेत त्या ठिकाणाहून जलजीवन योजनेची पाईप लाईन गेलेली आहे.
विशेषतः या टाक्या मासिक मिटींगला कोणताही सदस्य हजर नसताना सरपंच आणि उपसरपंच यांनी मंजुर केल्या आहेत. तसेच ज्या भागातून जलजीवन योजनेची पाईपलाईन गेलेली नाही त्या ठिकाणी या टाक्या होणे गरजेचे होते. परंतु सरपंच आणि उपसरपंच यांनी मनमानी आणि पदाचा दुरूपयोग करून या टाक्यांचा उपयोग फक्त स्वतःच्या शेतीच्या आणि आपल्या घरातील लोकांच्या उपयोगासाठी केला आहे. मात्र ज्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी ही टाकी होणे गरजेचे असताना जाणून बुजून तेथील ग्रामस्थांना पाण्यापासून वंचीत ठेवले आहे असे निवेदनात म्हटले आहे.
(प्रतिनिधी – नवनाथ गाडेकर)