राज्यात नवीन सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी समिती गठीत, आमदार सत्यजित तांबे यांचा समावेश

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्याच्या नवीन युवा धोरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्यात युवा धोरण, २०१२ च्या आधारे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी एक नवीन समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे.


या संदर्भातील शासन निर्णय २८ मे, २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्षम धोरणाची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण, २०१२’ हे धोरण जाहीर केले होते. मात्र, १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने, हे धोरण सध्याच्या गरजांनुसार अपुरे पडू लागले होते. त्यामुळे, राज्याच्या युवा धोरणामध्ये सुधारणा करून नवीन धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
नवीन धोरणाच्या निर्मितीसाठी आणि जुन्या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी शासनाने एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. या समितीमध्ये अनुभवी मंत्री, अधिकारी आणि तज्ञांचा समावेश असून समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी  राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्यावर सोपविण्यात आले असून समितीमधील अन्य सदस्यांमध्ये विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे, श्रीकांत भारतीय, अमोल मिटकरी यांच्यासह विधानसभा सदस्य संतोष दानवे, राजेश पवार, आशुतोष काळे यांच्यासह क्रीडा विभागाचे अपर सचिव, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय यांचा १ प्रतिनिधी (उपसचिव/ संचालक/ आयुक्त/ सहसंचालक किंवा यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी), कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम विभागाचे १ प्रतिनिधी (उपसचिव/ संचालक/ आयुक्त/ सहसंचालक किंवा यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी) यांचा समावेश करण्यात आला आहे.
या समितीला राज्याच्या युवकांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी एक मजबूत आणि सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हे नवीन धोरण युवकांना शिक्षण, रोजगार, क्रीडा, कौशल्य विकास आणि सामाजिक सहभागाच्या संधी उपलब्ध करून  देण्यास मदत करेल.


ही समिती येत्या तीन महिन्यात सूचना आणि शिफारसींचा विचार करून नवीन युवा धोरणाचा मसुदा तयार करेल. हे नवीन धोरण राज्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान देईल आणि युवकांना आत्मनिर्भर बनण्यास मदत करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सरकार नियुक्त समितीमध्ये अपक्ष आमदार तांबे यांनी युवकांशी संबंधित केलेले कार्य लक्षात घेता त्यांना संधी देण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *