ऊस व दूध हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत पीक आहे. शेतीमध्ये ठिबक सिंचनासह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. सातत्याने वापर होत असलेल्या शेतीमध्ये सेंद्रिय द्रव्यांची कमतरता झाली असून ती भरून काढण्याबरोबर कमी पाणी व कमी श्रमामध्ये एकरी 100 टना पेक्षा जास्त उत्पादन होणे गरजेचे असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

वाघापूर येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ऊस विशेषज्ञ सुरेश माने हे होते तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, ॲड नानासाहेब शिंदे, संचालक संपतराव गोडगे ,विनोद हासे,नवनाथ आरगडे, सतीश वर्पे ,डॉ तुषार दिघे ,रामदास धुळगंड ,गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, अंकुश ताजने, रामनाथ कुटे, योगेश भालेराव ,दिलीप नागरे, विलास शिंदे, ॲड. बाबासाहेब गायकर, बाजार समितीचे संचालक कैलासराव पानसरे, रवींद्र भोकनळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर कारखाना व सहकारी संस्था सुरू आहेत. अत्यंत काळजीपूर्वक व काटकसरीने कारखान्याचे कामकाज सुरू असून शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी कारखाना कायम कटिबद्ध आहे. ऊस वाढ योजनेअंतर्गत एकरी शंभर टना पेक्षा जास्त ऊस उत्पादन करणे आणि ऊस लागवडीचे नियोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.


सर्व शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये ऊस लागवड केली तर तोडणीसाठी अडचणी तयार होतात म्हणून टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. याचबरोबर कमी पाणी, कमी श्रम आणि जास्त उत्पादन गरजेचे आहे. शेतीमध्ये अनेक दिवसाचे सातत्याने उत्पादन होत असल्याने आता सेंद्रिय युक्त द्रव्यांची कमतरता त्यामध्ये निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी कारखान्याच्या कृषी विभागाच्या मदतीने आपल्याला सेंद्रिय द्रवांचा वापर करावा लागेल.
ऊस शेती ही निष्काळजीपणे न करता अधिक काळजीपूर्वक केल्याने नक्कीच एकरी उत्पादन वाढेल असा विश्वास व्यक्त करताना थोरात कारखान्यावर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व बाहेरील उत्पादक यांचाही मोठा विश्वास असल्याने कारखान्याचे सातत्याने गाळप चांगले होत असते. कार्यक्षेत्रात जास्त ऊस उत्पादन झाल्याने उपपदार्थांची निर्मिती जास्त होऊन त्याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल असे ते म्हणाले.
तर सुरेश माने म्हणाले की, शेतीमध्ये जास्त पाण्यापेक्षा पाण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. याकरता ठिबक सिंचनचा सर्वाधिक वापर करा. मे आणि जून महिन्यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो यासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी समजावून सांगितल्या. उसाची व्हरायटी, लागवड पद्धत, खते, फवारणी याबाबत शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर पिंपारणे, शेडगाव, शिबलापुर , पानोडी येथेही ऊस विकास मेळावा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे स्वागत ॲड नानासाहेब शिंदे यांनी केले. प्रास्ताविक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले.