शरीर स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने योगासने करणं गरजेचं – आमदार अमोल खताळ, पतंजली समितीच्यावतीने योग दिन उत्साहात

संगमनेर – योगासनांच्या माध्यमातून शरीराला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मिळत असते. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी योगासनाचा चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो म्हणून प्रत्येकाने शरीर स्वास्थ्यासाठी योगासने करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले. संगमनेर शहरातील मातोश्री लॉन्स येथे पतंजली योग समितीवतीने जागतिक योग दिन आ. अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर पतंजली योग समितीचे अध्यक्ष विजय देशमुख ,सचिव रमेश बांगर योग पीठ सदस्य सुभाष कुटे, योग शिक्षक कैलास कानवडे, अशोक जाधव, विकास पुंड, अनिता देशमुख, निवृत्ती शिर्के, कार्तिक पुंड यांच्यासह योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार खताळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व ओळखून दरवर्षी २१ जूनला संपूर्ण देशात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे जाहीर केले, तेव्हापासून आंतरराष्ट्रीय योगा दिन सर्वत्र साजरा होत आहे. काहीजण योग दिन फक्त एका दिवसासाठी साजरा करतात, परंतु पतंजली योगसमितीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येऊन रोज योगासने करतात ही आनंदाची गोष्ट आहे . योगाबद्दल अनेक समज-गैरसमज होते मात्र पतंजली योग समितीच्या माध्यमातून ते सर्व दूर करण्यात आले आहेत. गणेशनगरमध्ये योग भवन बांधण्यात आले आहे. त्याचाही योगसाधकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी यावेळी केले.


संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे म्हणाले, योगा ही एक भारताने जगाला दिलेली एक मोठी देन आहे. योगाच्या माध्यमातून आपलं शरीर, मन तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न असतो. कितीही धावपळ असली तरी प्रत्येकाने सूर्य नमस्कार, प्राणायाम केले तर आपलं आरोग्य हे उत्तम राहते याचा अनेक जणांनी अनुभव घेतला आहे. धकाधकीच्या जीवनात शरीर स्वास्थ्यासाठी योगा करणे काळाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *