दंडकारण्य अभियान पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर – थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले दंडकारण्य अभियानातून वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. यावर्षीही गावोगावी मोकळ्या जागेत विविध डोंगरांवर वृक्षारोपण करण्यात येणार असून दंडकारण्य अभियान हे पर्यावरण संवर्धनाची मोठी लोक चळवळ ठरली असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर 19 दंडकारण्य अभियानाची नियोजन बैठक झाली यावेळी मुख्य प्रवर्तक मा.आ.डॉ.सुधीर तांबे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पा घुले, दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ सुजित खिलारी, बाबुराव गवांदे, अनिल थोरात, सतीश गुंजाळ, बाळासाहेब सावंत, बाळासाहेब फापाळे, मधुकर गुंजाळ, नामदेव गुंजाळ यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे अधिकारी व दंडकारण्य समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की ग्लोबल वार्मिंग च्या समस्येमुळे उन्हाळा,पावसाळा, हिवाळा या ऋतूंमध्ये बदल झाला आहे. वाढलेली उष्णता आणि हवामानात होणारे बदल ही सजीव सृष्टीसाठी धोकादायक आहे. कोरोना संकटामध्ये ऑक्सिजन ची कमतरता जगाने अनुभवली. ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी वृक्ष महत्त्वाची आहेत म्हणून सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन हे मूलभूत कर्तव्य म्हणून बजावले पाहिजे. अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या सहकार्यातून तालुक्यातील विविध डोंगरांवर यावर्षीही वृक्षारोपण करण्यात येणार आहे. गावांमधील मोकळ्या जागेत उघड्या बोडक्या डोंगरांवर वृक्षारोपण करण्यात येणार असून या अभियानात सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. प्रत्येकाला वृक्षांचे महत्त्व पटले असून कारखान्या जवळील एटीपीचा डोंगर, खांडगाव कपालेश्वर, कोळवाडे येथील हरमन हिल,मोरया डोंगर, पिंपळगाव कोंझिरा कनकेश्वर,हिवरगाव पावसा येथील देवगड,कऱ्हे घाट,चंदनापुरी घाट, पेमगिरी शहागड, अशा विविध ठिकाणी संस्थांच्या माध्यमातून झालेल्या वृक्ष संवर्धनातून हा परिसर हिरवा दिसू लागला आहे. याचबरोबर मालपाणी उद्योग समूहाने खांडगाव येथे व स्वदेश उद्योग समूहाने धांदरफळ येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून संगोपन केले आहे. या लोक चळवळीमध्ये नागरिकांच्या सहभागाबरोबर वनविभाग,विविध सेवाभावी संस्था , यांनीही उस्फुर्त सहभाग घेतला असल्याचे त्यांनी म्हटले असून यावर्षीही सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी केले. तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले यावेळी अमृत उद्योग समूह विविध सेवाभावी संस्था व दंडकारण्य अभियान समितीचे सदस्य उपस्थित होते.

  • चंदनापुरी व कऱ्हे घाटात रस्त्यांच्या दुतर्फा विविध फुलांचे रोपण
    संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गात वर असणाऱ्या चंदनापुरी आणि कऱ्हे घाटामध्ये तसेच कोची, मल्हार घाट येथे ही रस्त्यांच्या दुतर्फा विविध रंगीबेरंगी फुलांचे रोपण दंडकारण्य अभियान समितीच्या वतीने करण्यात येणार असून गावागावांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फाही स्थानिक पातळीवर विविध फुलांचे रोपण करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *