संगमनेर – पत्रकार हा जनसामान्य माणसाचा आधारस्तंभ आहे. माझ्या सामाजिक, राजकीय जीवनामध्ये पत्रकारांचे योगदान महत्वाचे आहे. तर मी आमदार होण्यात पत्रकारांचेही योगदान मोठे आहे, त्यामुळे त्यांचे कुटुंब हे माझे कुटुंब आहे असे समजून कायमस्वरूपी पत्रकारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.

पत्रकारांचे कर्तव्य जरी समाजासाठी असलं तरी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी ही तितकीच महत्त्वाची आहे .या जाणिवेतून व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या माध्यमातून आ. अमोल खताळ यांच्या हस्ते पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, खजिनदार गोरक्षनाथ नेहे, संगमनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू, शहराध्यक्ष महेश पगारे, सचिव सचिन जंत्रे, कार्याध्यक्ष भारत रेघाटे, ज्येष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे, संजय अहिरे यांसह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती.
संगमनेरमधील पत्रकार यांचा आणि माझे गेली अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांनी मला इथून मागेही खूप मदत केली आहे आणि इथून पुढेही नक्कीच करतील अशी मला आशा आहे. त्यामुळे त्यांच्या पाल्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देणे हे माझे कर्तव्य आहे म्हणून मी इथून पुढे प्रत्येक वर्षी त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य देणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली .
- पत्रकार हा समाजाचा आरसा आहे मात्र आपल्या कुटुंबासाठीच त्यांच्याकडे वेळ नसतो. मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांनी लक्ष देणं आवश्यक असून कौटुंबिक जबाबदारी देखील पार पाडावी असं मनोगत तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू यांनी व्यक्त केलं.
- पत्रकारांच्या कुटुंबातील मुलं ही समाजाच्या सक्षम भवितव्यासाठीची बीजं आहेत त्यांना प्रोत्साहन देणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे मनोगत जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी व्यक्त केलं.
- पत्रकारांनी साहित्य वाटपाच्या अनेक बातम्या आपल्या दैनिकातून प्रसिद्ध केल्या परंतु त्यांच्या पाल्यांना आत्तापर्यंत शैक्षणिक साहित्य कुणीही दिले नाही मात्र आमदार अमोल खताळ यांनी पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे खजिनदार गोरक्ष नेहे आणि सदस्य संजय अहिरे यांनी यावेळी सांगितले. तर उपस्थितांचे आभार जेष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे यांनी मानले.
- संगमनेर शहरात एक पत्रकार भवन व्हावे यासाठी यापूर्वीच आपण आमदार निधीतून दहा लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र आता जागेचा प्रश्न बाकी राहिला आहे. दोन ठिकाणी जागा निदर्शनास आलेल्या आहेत. त्यातील एक जागा पत्रकार भवनासाठी उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश आपण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले असून पत्रकार भवन लवकरात लवकर उभे करण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय.