संगमनेर – राज्यातील वजनदार मंत्रीपद आणि नगरपालिकेतील सलग तीन दशकांची सत्ता उपभोगूनही संगमनेर शहराला ना स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून दिला, ना मूलभूत सुविधा दिल्या, हीच त्यांची मोठी चूक असून त्यातूनच जनतेचा रोष दिसतोय, माजी नगराध्यक्ष यांनी स्वतः वैफल्यग्रस्त होऊन स्वतःच्याच अपयशी कारभाराची कबुली देणारे विधान करत संगमनेर नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात केलेले आंदोलन हे केवळ एक राजकीय नौटंकी असल्याची टीका शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांनी केली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये फटांगरे म्हणाले की, संगमनेर नगरपालिकेमध्ये तुम्ही तब्बल तीस वर्षे एकहाती सत्ता उपभोगून, राज्यात मंत्रीपद मिळवूनही संगमनेर शहराची दुर्दशा रोखू न शकलेले माजी नगराध्यक्ष आज आंदोलनाच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे. हे वास्तव संगमनेरच्या जनतेपासून लपलेले नाही. स्वच्छ सुंदर आणि योजनाबद्ध शहराचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी रस्ते, नाले, गटार, कचरा व्यवस्थापन यातील भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराने शहराची अक्षरशः वाट लावली आहे. माजी नगराध्यक्षांनी नगर विकासाऐवजी प्लॉट आरक्षण, नाल्यांवर अतिक्रमण, भूमाफिया मिलाफ, भ्रष्ट ठेकेदारी यावर अंकुश ठेवण्याऐवजी त्याला खत पाणी घालण्याचे काम केले आहे. शहरातील नैसर्गिक स्रोत, जागा, प्लॉट, आरक्षणं, विकास आराखडा यांचा व्यापार केल्याने संगमनेर बकाल बनले आहे. संगमनेरचा “विकास मॉडेल” हा केवळ गाजावाजा ठरला असल्याची टीका फटांगरे यांनी माजी नगराध्यक्षांवर केली.
संगमनेरच्या सर्वसामान्य जनतेने विधानसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणले. अमोल खताळ यांच्या रूपाने या तालुक्याला आमदार मिळाला त्यांनी आपल्या आमदार पदाचा पदभार स्वीकारताच संगमनेर शहराला एक नव संजीवनी देण्याचा संकल्प करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी झपाटून काम सुरू केले आहे. स्वच्छता,आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक सुविधा या सर्व क्षेत्रांत संगमनेरकर जनतेला फरक जाणवत आहे, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर गटार सफाई,, औषध फवारणीचे आणि घंटागाड्याचे ठेके आपल्या पिलावळीला देऊन स्वतःच आंदोलन करणं म्हणजे जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे. पण आता संगमनेरकरांनी डोळ्यांत अंजन घातलं आहे. आणि त्यांनी ठरवलंय आहे की आता संगमनेरच्या विकासासाठी नगरपालिकेवर भगवाच फडकवायचा आहे. असा निश्चय संगमनेरकरांनीच केला असल्याचे फटांगरे यांनी ठणकावून सांगितले.