महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अकोले यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि कर्तृत्ववानांचा भव्य गौरव सोहळा संपन्न

अकोले -राजूर रोडवरील इंदोरी फाटा येथे स्थित मातोश्री लॉन्स या ठिकाणी दिनांक २५ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व अकोले शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा भव्य गौरव सोहळा उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

या उपक्रमाचे हे सलग २२ वे वर्ष असून, अकोले तालुक्यातील ९० माध्यमिक शाळा, ३२ आश्रमशाळा व १२ उच्च माध्यमिक विद्यालयांतील दहावी व बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू यामध्ये वह्या,दप्तर तसेच छत्री वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमामध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्तेचा सन्मान न करता, समाजकार्य, प्रशासन, पत्रकारिता, करिअर मार्गदर्शन, शैक्षणिक व्यवस्थापन आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील योगदानाबद्दलही अनेक मान्यवरांना विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ज्येष्ठ समाजसेवक व NKT ट्रस्टचे अध्यक्ष मा. नानजीभाई खेमजीभाई ठक्कर यांचा विशेष सन्मान हा ठरला. समाजसेवेत त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांना विशेष आदराने गौरविण्यात आले.
त्यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
“आजच्या काळात डॉ. आरोटे सारखा निस्वार्थ पत्रकार शोधूनही सापडणार नाही. पत्रकार बांधवांसाठी आणि समाजहितासाठी लढणारा हा नेता म्हणजे पत्रकारितेचे आदर्श उदाहरण आहे,” असे ठक्कर म्हणाले.तसेच विद्यार्थ्यांनाही त्यांनी सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्याचे मौलिक मार्गदर्शन करत सांगितले,
“मोबाईलपासून शक्य तितके दूर राहा, व्यसनाधीनतेपासून स्वतःचे रक्षण करा, आणि तुमचे सर्व लक्ष शिक्षणावर केंद्रित करा. समाज घडवण्याचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांच्या हाती आहे.”

या उपक्रमामागचे प्रमुख प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून अतिशय प्रेरणादायी भाषण केले.
त्यांनी सांगितले कि, “विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणे ही परंपरा नाही तर आमची सामाजिक बांधिलकी आहे. हे व्यासपीठ म्हणजे पालक, शिक्षक, आणि विद्यार्थ्यांमधील सकारात्मक दुवा आहे. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही मान-सन्मान मिळावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

करिअर मार्गदर्शक मा. घनश्याम माने यांनी विद्यार्थ्यांना करिअरमधील विविध संधींबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, माहिती तंत्रज्ञान, उद्योजकता, संरक्षण सेवा, तसेच शासनाच्या विविध योजनांतून मिळणाऱ्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘स्वतःवर विश्वास ठेवा, ध्येय ठरवा आणि सातत्याने प्रयत्न करत राहा’ असा सकारात्मक संदेश दिला.
माने सरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते देखील मोठ्या यशाची शिखरे गाठू शकतात हे विविध यशस्वी उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. त्यांनी करिअर निवडीवेळी आवड, क्षमता आणि उपलब्ध संधी यांचा समतोल साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या गौरव सोहळ्यात अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. मोहन बोरसे यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना अतिशय सादगीपूर्ण, प्रामाणिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, “अभ्यासात किती टक्केवारी मिळाली यापेक्षा तुम्ही स्वतःवर किती आत्मविश्वास ठेवता हे महत्त्वाचे आहे. मीही शालेय जीवनात फारशा चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण झालो नव्हतो, पण सातत्याने मेहनत करत गेलो आणि आज मी पोलीस निरीक्षक आहे. त्यामुळे कमी गुण म्हणजे अपयश नाही – ती नवीन संधी असते.” मोबाईलच्या अतिवापरावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका करत विद्यार्थ्यांना डिजिटल शिस्त पाळण्याचे महत्त्व पटवून दिले.

  • प्रमुख उपस्थित मान्यवर आणि सत्कारमूर्ती – मा. नानजीभाई खेमजीभाई ठक्कर – अध्यक्ष, NKT ट्रस्ट, मा. डॉ. विश्वासराव आरोटे – राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मा. किरण लोहरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेते, मा. मोहन बोरसे – पोलीस निरीक्षक, अकोले, मा. सिद्धार्थ मोरे – तहसीलदार, अकोले, राजूर, मा. अरविंद कुमावत – गटशिक्षणाधिकारी, मा. नवनाथ जाधव – राज्य प्रसिद्धी प्रमुख, प्रा. विद्याचंद्र सातपुते – जिल्हा उपाध्यक्ष, मा. भाऊसाहेब वाकचौरे – जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, संत नामदेव आंब्रे, मा. अनिल राहणे, मा. सोमनाथ काळे, मा. घनश्याम माने
  • आयोजन समितीचे संयोजन आणि योगदान – डॉ. विश्वासराव आरोटे – राज्य सरचिटणीस,अशोकराव उगले – तालुका अध्यक्ष, दत्ता जाधव – तालुका कार्याध्यक्ष, हरिभाऊ फापाळे – तालुका सचिव, कार्यक्रमाचे संयोजन, नियोजन व अंमलबजावणी हे अतिशय सुयोजित आणि अनुशासित पद्धतीने पार पडली.
    या प्रेरणादायी गौरव सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवला, तर पालक आणि शिक्षकांमध्ये अभिमानाचे क्षण निर्माण केले.
    कार्यक्रमात समाजसेवा, पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्राचा सुरेख संगम पहायला मिळाला.
    नानजीभाई ठक्कर यांचे मार्गदर्शन आणि डॉ. विश्वासराव आरोटे यांचे नेतृत्व हे या कार्यक्रमाचे खरे बलस्थान ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *