निळवंडे धरण व कालवे हे आमदार बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले आहे. कालव्यातून पाणी सर्व दुष्काळी भागाला देण्यासाठी त्यांनी सर्व उपाययोजना केल्या. ज्या भागाला कालव्यातून मिळणार नाही. अशा भागांकरिता उपसा जलसिंचन योजनांसाठी पूर्वमंजुऱ्या घेतल्या मात्र सध्याचे पालकमंत्री विखे यांनी या सर्व मंजूरी रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असा पुराव्यानिशी आरोप इंजिनियर बी.आर.चकोर यांनी केला आहे.
पिंपळे येथे झालेल्या गाव बैठकीत ते बोलत होते. यावेळी सरपंच अण्णासाहेब ढोणे,माजी सरपंच नामदेव कोटकर, सागर चकोर,रामा कोटकर, सौ विजया ढोणे,चेअरमन भाऊ पाटील चकोर यांसह मुंबई तरुण मित्र मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बी.आर.चकोर म्हणाले की, दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे हे आमदार बाळासाहेब थोरात यांनीच पूर्ण केले आहे. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावून पहिले भिंतीचे काम केले. आणि त्यानंतर सातत्याने निधी मिळून कालव्यांची कामे केली 2014 ते 2019 या काळात कालव्यांची गती पूर्णपणे मंदावली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच मोठ्या प्रमाणात निधी मिळून अगदी कोरोना संकटातही त्यांनी कालव्यांची कामे पूर्ण केली.
दुष्काळी जनतेला पाणी देणे हा ध्यास आमदार थोरात यांचा होता आणि यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. मात्र कालव्यांमधून ज्या भागाला पाणी मिळणार नाही याकरता विशेष उपसा सिंचन योजनेचा आराखडा तयार करून याच्या सर्व पूर्वपरवानगी आमदार बाळासाहेब थोरात यांनी घेतल्या होत्या.
मात्र तोडाफोडीचे राजकारण करून महायुतीचे सरकार सत्तेवर आले. आणि विखे पालकमंत्री झाले. यावेळी त्यांनी 28 नोव्हेंबर 2022 रोजी निळवंडे ची विशेष आढावा बैठक घेतली. यामध्ये प्रशासनाला स्पष्ट सूचना निमोण, सोनेवाडी, पारेगाव खुर्द, पारेगाव बुद्रुक, तिगाव, काकडवाडी, करुले ,नान्नज दुमाला या गावांकरता असलेली तळेगाव व निमोन उपसा सिंचन योजना रद्द करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या.
खरे तर दहा टक्के पाणी उचलण्याचा अधिकार सर्वांना आहे .आणि त्यामुळे त्या अंतर्गत सर्व परवानगी आमदार बाळासाहेब थोरात यांनी मिळवल्या होत्या. महाविकास आघाडीचे सरकार असते तर या उपसा सिंचन योजनेतून या सर्व गावांना निळवंडे च्या कालव्यांचे पाणी मिळाले असते. मात्र मंत्री विखे यांनी या योजना रद्द केल्याने वरील गावातील नागरिकांना या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे.
त्यामुळे आमदार बाळासाहेब थोरात ही संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना पाणी देण्यासाठी कटिबद्ध असून पूर्वेकडील नेत्यांनी फक्त पाण्याचे राजकारण करून नागरिकांना झुलवत ठेवले असल्याचा आरोप त्यांनी केला असून तुम्हाला चांगले करता येत नसेल तर कमीत कमी आमच्या योजना रद्द करू नका अशी कळकळीची विनंती समस्त निमोन तळेगाव भागाच्या वतीने चकोर यांनी केली आहे.
अनेक दिवस भोजापुर चारी व निळवंडे बाबत विष कालवण्याचा प्रकार या काही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी केला असून आता खरी वस्तुस्थिती जनतेला कळली असल्याचे सरपंच अण्णासाहेब ढोने यांनी म्हटले आहे.
यावेळी गावातील विविध कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. बि आर.चकोर यांनी सोशल माध्यमांवरही या बैठकीचे काही मुद्दे प्रसारित केले असल्याने निमोन तळेगाव भागामध्ये महायुती व विखे यांच्या बद्दल प्रचंड संताप निर्माण झाला आहे.