पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळण्यासाठी सन २०११ पासून शासन दरबारी हेलपाटे मारत आहे. ज्यांच्याकडे जेव्हा सत्ता होती तेव्हा शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. तसेच शेतकऱ्यांच्या या मागणीबत कधीही कळवळा दाखवला नाही, आता ज्या शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम बंद केले म्हणून तुम्हाला जाग आली, जसे तुम्ही काम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतात तसा चंदनापुरी आणि परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या गेलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठी पुढाकार का घेतला नाही ? असा परखड सवाल उपस्थित करत केवळ ठेकेदार पोसले पाहिजे आणि त्यांच्याकडून आपल्याला व आपल्या बगलबच्चांना मलिदा कसा मिळेल यासाठी बाधित शेतकऱ्यांना तुम्ही वेठीस धरत असल्याची टीका चंदनापुरीचे माजी सरपंच रोहिदास रहाणे यांनी महामार्गाचे काम सुरू करण्यास पुढाकार घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर केली आहे.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे सन २०११ ला चौपदरीकरणाचे काम करत असताना या महामार्गात चंदनापुरी, आनंदवाडी, हिवरगाव पावसा, रायतेवाडी, खांडगाव या गावांमधील सुमारे २५२ शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी शासनाने अगदी तुटपुंज्या स्वरूपात रक्कम देऊन बाधित शेतकऱ्यांची बोळवण केली होती. तेव्हा या भागातील बाधित शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळावा यासाठी राष्ट्रीयमहामार्ग प्राधिकरण विभागाकडे निवेदन सादर केली होती, तसेच हा प्रश्न लवादात सुद्धा दाखल केला होता. तेव्हापासून २०२५ पर्यंत या भागातील एकाही शेतकऱ्याला वाढीव मोबदला मिळाला नाही.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेत आम्हाला मोबदला मिळवून द्या असे साकडे घातले. आमदार खताळ यांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला लवकरात लवकर द्यावा असे निर्देश आ. खताळ यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर या राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले. मात्र आमदार खताळ यांनी सूचना देऊनही अधिकाऱ्यांनी या भागातील बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला दिला नाही म्हणून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या काँक्रिटीकरणाचे काम बंद पाडले होते. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे लोणी येथे एका कार्यक्रमानिमित्ताने आले होते त्यावेळी आमदार खताळ यांनी बाधित शेतकऱ्यांसह मंत्री गडकरी यांची भेट घेतली आणि राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेलेल्या सर्व बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळवून दयावा असे साकडे घातले होते. त्यावेळी मंत्री गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
येथून मागे राज्यात मंत्री असताना या भागातील शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी कधीही प्रयत्न केला नाही. तेच काँग्रेसचे माजी मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे बाधित शेतकऱ्यांनी बंद पाडलेले काम सुरू करण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यावेळी तुम्ही जर या बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न केला असता तर त्यांना या राष्ट्रीय महामार्गाच्या कॉंक्रिटीकरणाचे काम बंद पाडण्याची आज वेळ आली नसती. महामार्गात जमिनी गेलेल्या बाधित शेतकऱ्यांनी बंद केलेले काम सुरू करण्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश आहे ? हे समजत नाही, त्यांनी बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा विचार न करता ठेकेदार कसे पोसले जातील आणि त्यातून आपल्याला कसा मलिदा मिळेल यासाठी काँग्रेस नेत्यांचा खटाटोप सुरू आहे. जसे तुम्ही काम सुरू करण्यासाठी पुढाकार घेत आहेत तसे या बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला कसा लवकरात लवकर मिळेल यासाठी पुढाकार घेतला असता तर त्यांना त्याचे समाधान वाटले असते. परंतु तुम्ही त्यांना वाढीव मोबदला मिळवून देण्याऐवजी प्रशासनाला निवेदन देऊन शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप विलास सरोदे, वसंत गुंजाळ, अशोक वर्पे यांच्यासह आनंदवाडी, चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा, रायतेवाडी, खांडगाव, कासारा दुमाला, गुंजाळवाडी या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.