संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करून या कामांना गती देण्याचे काम आमदार अमोल खताळ हे करत आहे. शहरातील पंचायत समिती जवळील गुंजाळ नगर परिसरात सुरू असलेल्या ट्रक टर्मिनलचे काम रखडल्याने त्यांनी या कामाची पाहणी करून ट्रक टर्मिनलचे काम लवकर पूर्ण करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या कामाच्या श्रेय घेण्याबाबत त्यांनी कुठलेही वक्तव्य केले नाही. आमदार खताळ हे झपाट्याने तालुक्यातील विकास कामांकडे लक्ष देत असल्याने विचलित झालेल्या नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांना पुढे करून आमदार खताळ यांच्यावर खोटी टीका केली आहे असा आरोप या परिसरातील कार्यकर्त्यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहरातील पंचायत समिती जवळ केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीमधून संगमनेर नगर परिषदेच्या माध्यमातून ट्रक टर्मिनलचे काम सुरू आहे. मागील वर्षी या कामाला मंजुरी मिळाली होती. या कामासाठी जवळपास सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या काही महिन्यापासून या टर्मिनलचे काम सुरू आहे. या कामाची गती अतिशय कमी असल्याने आमदार खताळ यांनी या ठिकाणी येऊन ट्रक टर्मिनलच्या कामाची पाहणी केली, त्यांच्या समवेत संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. आमदार खताळ यांनी या कामाची पाहणी करून हे काम लवकरात लवकर आणि चांगल्या दर्जाचे करावे अशा सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या. या कामाचे श्रेय घेण्याबाबत त्यांनी कुठलेही वक्तव्य केलेले नव्हते. असे असतानाही काही स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून आमदार खताळ यांच्यावर टीका करणारे पत्र प्रसिद्ध केले आहे.
ट्रक टर्मिनलचे काम कोणी केले, जमीन देण्यासाठी स्थानिकांची कशी मदत झाली, याबाबतची माहिती घ्या मग श्रेय घ्या अशी टीका त्यांच्या पत्रकाद्वारे करण्यात आली होती. वास्तविक आमदार अमोल खताळ हे ट्रक टर्मिनलच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते त्यावेळी टीका करणारे दोघेही कार्यकर्ते त्या ठिकाणी नव्हते. त्यांच्या आडून भलतेच प्रश्न विचारत आहे. या दौऱ्यात आमदार खताळ यांनी या कामाचे श्रेय घेण्याबाबत कुठलेही वक्तव्य केले नव्हते, मात्र केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून नेत्यांकडून आपल्या निवडक कार्यकर्त्यांना हाताशी धरून आमदार खताळ यांच्यावर टीका करण्यात आली आहे . अशी टीका करून आपले अपयश झाकण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न असल्याची टीका स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
या ट्रक टर्मिनलला जागा देण्यासाठी स्थानिक नागरिकांचे योगदान असल्याचे म्हटले होते. टीका करणाऱ्यांना याबाबत अपूर्ण माहिती आहे. वास्तविक टर्मिनल च्या कामासाठी जागा देण्याबाबत स्थानिक नागरिकांची कुठलीही भूमिका नाही. केवळ एका कुटुंबाने ही जागा दिलेली आहे. या टर्मिनलचे काम घेणारा ठेकेदार वेगळा असून तो या कामाकडे फिरकतही नाही. टर्मिनलचे काम करणारे ठेकेदार वेगळेच आहे. टर्मिनलसाठी जमीन देणारेच या टर्मिनलचे काम करत आहे. कार्यकर्त्यांच्या आडून आमदार खताळ यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आपल्या समर्थकांना या टर्मिनल चे काम दिले आहे. या कामासाठी केंद्र सरकारचा निधी मिळत आहे. आमदार खताळ योग्य वेळी या कामाची तपासणी करतील असे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. या पत्रकावर शिवम गुंजाळ, अक्षय गुंजाळ, अभिजीत घाडगे आदींच्या सह्या आहेत.