संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून निळवंडे धरणातून दोन्ही कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे आता शेतकर्यांच्या खरिपाच्या पिकांची चिंता मिटणार आहे. या निर्णयामुळे निळवंडे धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी कालव्याच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील गावांना मिळणार आहे. तसेच नदीकाठच्या गावांमधील पाणी पुरवठा योजनांना या पाण्याचा लाभ मिळणार असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.


संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी निळवंडे धरणातील उपलब्ध पाण्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवि ण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठ पुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याची तातडीने दखल घेत जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाला पाणी सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. यानुसार आज (मंगळवार) निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात आले.
खरीप हंगामातील कोवळी पिके सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने आणि जोरदार वारे व उष्ण हवामानामुळे जमिनीतील ओलावा कमी होत चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अशात या निर्णयामुळे तालुक्यातील जिरायती शेतीसह खरीप पिकांना नवी संजीवनी मिळणार आहे. आमदार अमोल खताळ यांच्या या तत्परतेबद्दल स्थानिक नागरिक व शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.