थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील 171 गावे 258 वाड्या व विविध वस्त्यांवर महिला भगिनींनी मोठ्या आनंदात व उत्साहात 2525 वटवृक्षांचे रोपण व पूजन करून वृक्ष संवर्धनाचा मंत्र राज्याला दिला आहे.
महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियान समिती व अमृत उद्योग समूह यांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या सहभागातून दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ बनली आहे.
प्रकल्पप्रमुख सौ दुर्गाताई तांबे व कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी तालुक्यातील 171 गावे 258 वाड्या व विविध वस्त्यांवर 2525 वटवृक्षांचे रोपण व पूजन महिलांनी केली असून या वटवृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक महिलांनी उचलली आहे.



भारतीय संस्कृतीमध्ये सत्व, श्रद्धा, आणि पतीपरायणतेचे प्रतीक असलेल्या वटसावित्री पौर्णिमेनिमित्त विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात.देशभरात मोठ्या उत्साहात सर्वत्र वटसावित्री पौर्णिमा सण साजरा झाला याच वेळी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी तालुक्यातील महिलांनी घेऊन राज्यापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
देवकौठे ते बोटा अशा 106 किमी लांबी असलेल्या विस्तीर्ण संगमनेर तालुक्यामध्ये सर्व महिलांनी देव वृक्ष असलेल्या वटवृक्षाचे पूजन व संवर्धन करून पर्यावरण संवर्धनात महत्त्वाचा वाटा उचलताना राज्याला हिरव्या सृष्टीचा मंत्र दिला आहे. गावोगावी पारंपारिक पद्धतीने नटून-थटून महिलांनी वटवृक्षाची पूजन केले. यावेळी विविध गावांमध्ये सौ निर्मलाताई गुंजाळ, सौ अर्चनाताई बालोडे, सौ प्रमिलाताई अभंग, सौ मंदाताई सोनवणे, सौ दिप्ती सांगळे, प्रीती फटांगरे ,भाग्यश्री नरवडे ,बेबीताई थोरात, मीनाक्षी थोरात, ममता गुंजाळ, पद्मा थोरात, शकुंतला सोसे, शितल उगलमुगले , सौ मीरा शेटे ,नंदाताई खेमनर ,प्रतिभा जोंधळे, निशाताई कोकणे, लताताई गायकर, अनिता सोनवणे, यांच्यासह स्थानिक महिलांनी मोठ्या उत्साहाने वटवृक्षाची पूजन केले.


यावेळी बोलताना काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सौ अर्चनाताई बालोडे म्हणाल्या की, वटसावित्री हा महिलांच्या जीवनातील महत्त्वाचा सण आहे मात्र भाजपने याचे राजकारण सुरू केले आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये भाजपचे काय योगदान कोणता पदाधिकारी सीमेवर लढण्यासाठी गेला होता. ते यश सैनिकांचे आहे. भाजपचे नाही तेव्हा भाजपने असे सिंदूर चे नाव घेऊन गलिच्छ राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी केले.
तर सौ निर्मलाताई गुंजाळ म्हणाल्या की, प्रत्येक ठिकाणी धार्मिक भावना निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा डाव भाजप करत आहे. ज्या अतिरेक्यांनी पहलगाम मध्ये गोळीबार केला की अतिरेकी अजून सरकारला सापडले नाही आणि अमेरिकेद्वारे शस्त्र संधी केल्यानंतर ऑपरेशन सिंदूर करून श्रेय लाटण्याचा अत्यंत चुकीचा प्रकार भाजप व त्यांचे कार्यकर्ते करत असल्याने अशा गलिच्छ राजकारणाला थारा देऊ नका असे आवाहन काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ निर्मलाताई गुंजाळ यांनी केले आहे.
खरे तर या चांगल्या सणांमध्ये राजकारण नको आहे मात्र सत्ताधारी महायुती व भाजपचे कार्यकर्ते राजकारण करत आहेत की दुर्दैवी असल्याची भावना तालुक्यातील असंख्य महिलांनी बोलून दाखवली.
- वृक्ष संवर्धन चळवळीत महिलांचा मोठा सहभाग – दुर्गाताई तांबे
भारतीय संस्कृतीमध्ये वटसावित्री पौर्णिमेला मोठे महत्त्व असून वड हा दीर्घायुष्य वृक्ष आहे तो मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देत असून आध्यात्मिक आणि शास्त्रीय असे दोन्ही कारण वट पूजेसाठी आहेत. मागील दहा वर्षापासून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये महिला भगिनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाचे रोपण व पूजन करत असतात. तालुक्यात झाडांचे संवर्धन करण्याची संस्कृती वाढली आहे. प्रत्येक घराच्या भोवताली वृक्षांसह परसबागा निर्माण झाले वृक्ष संवर्धन चळवळीमध्ये महिलांचे मोठे योगदान असून प्रत्येक महिलेने दरवर्षी किमान दोन वृक्षांचे रोपण करावे असे आवाहन त्यांनी केले. - वटवृक्ष हा सर्वाधिक ऑक्सिजन देणारा वृक्ष – डॉ. जयश्रीताई थोरात
पेमगिरी वटवृक्षाला ऐतिहासिक दर्जा देण्याबाबत पाठपुरावा
तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व प्रत्येकाला कळाले. आपल्याला आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देणारे हे वृक्ष आहेत. त्यामध्ये वटवृक्ष, पिंपळ, उंबर, कडुलिंब हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे असल्याने त्यांना आपण देव वृक्ष म्हणून संबोधतो. प्रत्येक महिलेने मुलांप्रमाणे वृक्षांची काळजी घेतली तर पर्यावरणाचा मोठा धोका आपण टाळू शकतो. ग्लोबल वार्मिंग च्या समस्येमुळे सजीव सृष्टीला मोठा धोका निर्माण झाला असून हा धोका टाळण्यासाठी वृक्ष रोपण संवर्धन व पर्यावरण जपण्यासाठी महिलांनी व युवक आणि युवतींनी या पुढील काळात काम करावे असे आवाहन त्यांनी केले.. याचबरोबर संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील साडेतीन एकरवर असलेला महाकाय वटवृक्ष संगमनेर तालुक्याची ओळख असून या वटवृक्षाला ऐतिहासिक दर्जा मिळावा यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.