संगमनेर – पतसंस्था म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून, ती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी थेट जोडलेली एक महत्त्वाची सामाजिक आणि आर्थिक नाळ आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त आर्थिक मदतच नाही तर आत्मविश्वास, स्थैर्य आणि भविष्यातील वाटचालीसाठी आधार मिळतो. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकरी हितासाठी जे कार्य केले, त्यातून खरी सहकारी चळवळ साकारली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आज या चळवळीला अधिक मजबुती देण्याचे काम संगमनेर तालुका पतसंस्था फेडरेशन करत आहे असे उद्गार एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांनी काढले.

संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने पतसंस्थांमधील अधिकारी, संचालक आणि कर्मचारी यांच्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सापुतारा जवळील हातगड किल्ल्यावर दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्दिष्ट म्हणजे पतसंस्थांचे व्यवस्थापन अधिक सक्षम करणे, निर्णय प्रक्रियेत गुणवत्ता वाढवणे आणि नवीन तंत्रज्ञान व संकल्पना आत्मसात करणे होय. प्रशिक्षणासाठी जात असलेल्या या शिष्टमंडळाने संगमनेरमध्ये यशोधन कार्यालय येथे थांबून डॉ.जयश्री थोरात यांची भेट घेतली. यावेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष बापूसाहेब टाक, विकास वाव्हळ,मधुकर गुंजाळ, देविदास गोरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांच्याशी संवाद साधताना डॉ. जयश्री थोरात यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. त्या पुढे म्हणाल्या, पतसंस्था फेडरेशनने हा अतिशय विधायक उपक्रम राबवला असून अशा प्रकारच्या शिबिरांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ज्ञानवर्धन होईल. यामध्ये भाग घेणाऱ्यांना नवीन विचार, संकल्पना आणि धोरणे समजून घेण्याची संधी मिळेल. यामुळे संस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि कार्यक्षम बनतील.
या दोन दिवसीय शिबिरात पतसंस्थांच्या कामकाजाशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक करणार असून, व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्व विकास, वित्त नियोजन, डिजिटल व्यवहार, पतसंस्था कायदे व नियम, ग्राहक सेवा, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. संपूर्ण संगमनेर तालुक्यातील पतसंस्थांमधील पदाधिकारी व कर्मचारी या शिबिरामध्ये सहभागी होत असून, सर्वांचा सहभाग उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी ठरत आहे. शिबिरातून मिळणारे ज्ञान व अनुभव संस्थांच्या कार्यात नवचैतन्य निर्माण करणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.