संगमनेर तालुक्यातील गौण खनिज आणि वाळू तस्करी यांचे प्रमाण मागील सहा महिन्यात जास्त वाढले आहे . तालुक्यातील चारही दिशेला सर्रासपणे वाळू, मुरूम, खडी डबर, माती, गौण खनिजाची सर्वत्र तस्करी सुरू आहे. तालुक्यातील निमज या गावाच्या शिवारात खासगी रस्ता करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा करून वापरला जात असल्याचा प्रकार समोर आला असून अवैधरित्या मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती स्थानिक तलाठी यांना मिळाल्यानंतर त्यांनी जागेवर जात एक ट्रॅक्टर ट्रॉली सह पकडला. मात्र इतर जेसीबी व ट्रॅक्टर वाहने पळून नेली असल्याची माहिती समजली आहे.

महसूल विभागाकडून होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संगमनेर तालुक्यातील नद्यांचे आणि जमिनीचे अक्षरशः लचके तोडले जात आहेत. राजकीय दबावामुळे कर्मचारी आणि अधिकारी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. कारवाई करताना महसूल कर्मचाऱ्यांवर सत्ताधारी आणि बिगर सत्ताधारी पुढाऱ्याकडून दबाव येत असल्याचे सांगितले जात आहे.


आज निमज येथे एका शिवारात मुरूम टाकून रस्ता बनवला जात असल्याचे काही गावकऱ्यांच्या लक्षात आले. यासाठी मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा केला जात होता. त्यासाठी जेसीबी आणि ट्रॅक्टर ट्रॉल्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू होता. सदर खबर तलाठी फटांगरे यांना देण्यात आली. मात्र फटांगरे हे घटनास्थळी पोहोचेपर्यंत जेसीबी व इतर ट्रॅक्टर पळून गेले. परंतु एक ट्रॅक्टर रस्ता करताना जमिनीत अडकल्याने सदर ट्रॅक्टर जागेवरच पकडण्यात आला. हा ट्रॅक्टर ट्रॉलीसह मिळून आला असून या ट्रॅक्टरला काढताना एक दुसरा ट्रॅक्टर देखील मिळून आला आहे. तलाठी फटांगरे यांनी या ठिकाणी पंचनामा करून सदर माहिती तहसील कार्यालयाला कळवली असल्याचे सांगितले.
सदर मुरूम उपसा करणाऱ्या मंडळींनी सत्तेतील विविध नेत्यांची नावे घेऊन तलाठी मंडलिक यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा असून आमच्याकडे परवाना आहे असा कांगावा देखील केला. मात्र परवाना कोणीही दाखवला नाही. सदर पंचनामा तहसील कार्यालयात देण्यात आला असून कागदपत्राची शहानिशा करून संबंधितांवर कारवाई केली जाईल असे तलाठी फटांगरे यांनी सांगितले आहे.
नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
इतकी मोठी मुरूम तस्करी झाल्यानंतर त्याचा पंचनामाही झाला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र राजकीय दबाव असल्यामुळे हा ट्रॅक्टर व जेसीबी अद्यापही तहसील कार्यालयात जमा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.